स्पोर्ट्स

Mohammed Siraj vs Dhoni : ‘मिया भाई’ने थाटात मोडला ‘माही’चा विक्रम! विदेशातील कसोटी विजयांच्या शर्यतीत सिराजने धोनीला पछाडले

Oval Test Won : विदेशात खेळाडू म्हणून मोहम्मद सिराजचा हा १२ वा कसोटी विजय ठरला.

रणजित गायकवाड

इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांची ही कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली. भारतीय संघाच्या या महत्त्वपूर्ण विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने उत्कृष्ट कामगिरी करत अत्यंत निर्णायक भूमिका बजावली.

सिराजने ५ सामन्यांच्या मालिकेत १८५.३ षटके गोलंदाजी करत २३ बळी मिळवले. ओव्हल कसोटीतील विजयात त्याने सिंहाचा वाटा उचलला. या विजयानंतर, विदेशात भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत डीएसपी सिराजने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले आहे.

विदेशात धोनीच्या नावावर ११ कसोटी विजय

विदेशात खेळाडू म्हणून मोहम्मद सिराजचा हा १२ वा कसोटी विजय ठरला. याउलट, धोनीने खेळाडू म्हणून परदेशात खेळलेल्या ४८ कसोटी सामन्यांपैकी ११ सामन्यांत विजय मिळवला होता. सिराजने आतापर्यंत परदेशात एकूण २७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला १० सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर पाच सामने अनिर्णित राहिले.

या कामगिरीसह सिराजने जसप्रीत बुमराहच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बुमराहनेही विदेशात १२ कसोटी विजय मिळवले आहेत. एकंदरीत, कसोटी क्रिकेटमध्ये सिराजचा हा २२ वा विजय असून त्याने या बाबतीत मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

राहुल द्रविडच्या नावे विशेष विक्रम

भारतीय खेळाडू म्हणून विदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. द्रविडने त्याच्या कारकिर्दीत विदेशात खेळलेल्या ९३ पैकी २४ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे. कोहलीने विदेशी भूमीवर ६८ कसोटी सामने खेळून २३ सामन्यांत विजय संपादन केला आहे.

ओव्हल कसोटीत सिराजची भेदक गोलंदाजी

ओव्हल कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण ९ बळी घेतले. पहिल्या डावात त्याने ८६ धावांत ४, तर दुसऱ्या डावात १०४ धावांत ५ बळी घेण्याची किमया केली. या शानदार कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच्याव्यतिरिक्त, प्रसिद्ध कृष्णानेही या सामन्यात एकूण ८ बळी मिळवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT