Mohammed Shami Hat Trick : भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शनिवारी (दि. ६) बंगाल टी-२० लीगमध्ये हॅटट्रिक घेत मोठी कामगिरी केली. शनिवारी ईडन गार्डन्सवर सर्वोटेक सिलिगुडी स्ट्रायकर आणि श्राची रार्ह टायगर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सिलिगुडी स्ट्रायकर संघाने हा सामना २४ धावांनी जिंकला.
सिलिगुडीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २०८ धावा केल्या होत्या. विशालने संघासाठी ४६ चेंडूत ८६ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकार मारले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्राची रार्ह टायगर्स संघाला २० षटकांत ४ बाद १८४ धावाच करता आल्या. संघाकडून शुवम डे याने २५ चेंडूत ४८ आणि राहुलने २६ चेंडूत ४४ धावा केल्या.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने डावातील १६ व्या षटकात सलग तीन चेंडूंवर तीन बळी घेतले. त्याने चौथ्या चेंडूवर शाहबाज अहमदला बाद केले. त्यानंतर पुढील चेंडूंवर रोहित कुमार आणि दीपांजन मुखर्जी यांना बाद करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. शमीने ४ षटकांत २७ धावा देत ४ बळी घेतले. करण लालनेही ३६ धावा देत तीन बळी घेतले.
याआधी मोहम्मद शमीने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकातही हॅटट्रिक घेतली होती. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नबी, आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांना बाद करून ही कमाल केली होती. तसेच घरगुती क्रिकेटमध्येही शमीने ही कामगिरी केली आहे. त्याने मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात तीन चेंडूंत तीन बळी घेतले होते. चेतन शर्मा यांच्यानंतर एकदिवसीय विश्वचषक सामन्यात हॅटट्रिक घेणारा मोहम्मद शमी हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
मोहम्मद शमी गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. यावरुन शमी आणि मुख्य निवडकर्ता यांच्यात निवडीवरून वादही झाला होता. शमीने स्वतःला फिट घोषित केले होते, मात्र निवड समिती त्याला फारशी दाद देत नव्हती. शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामन्यात २२९ बळी घेतले आहेत. तर १०८ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २०६ बळी घेतले आहेत.
सर्वोटेक सिलिगुडी स्ट्रायकर संघाने खरेदी केलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे नाव सर्वात चर्चेत राहिले, त्याला ५.२० लाख रुपयांना संघात सामील करण्यात आले. तर बंगालचा वेगवान गोलंदाज ईशान पोरेल याला २.५० लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. फ्रँचायझीने करण लालसाठीही मोठी बोली लावत त्याला ८ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले, ज्यामुळे तो बंगाल टी-२० लीग पुरुषांच्या लिलावात पहिल्या १० सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये सामील झाला.