

टी-२० विश्वचषक स्पर्धेत संजू सॅमसनने आतापर्यंत चार सामन्यांत ७७.३३ च्या सरासरीने आणि २०१.७३ च्या स्ट्राइक रेटने २३२ धावा केल्या आहेत.
Shoaib Akhtar on Sanju Samson’s comeback
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारतीय फलंदाज संजू सॅमसन सध्या सुवर्णकाळ अनुभवत आहे. सॅमसनच्या या यशाचे श्रेय पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला दिले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या 'व्हर्च्युअल' उपांत्यपूर्व फेरीत संघात पुनरागमन करणाऱ्या संजू सॅमसनने ९७ धावांची खेळी करून विंडिजला स्पर्धेतून बाहेर केले. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध त्याने ४२ चेंडूत ८९ धावांची वादळी खेळी करत भारताला अंतिम फेरीत मजल मारून दिली.
'पीटीव्ही स्पोर्ट्स'वरील 'गेम ऑन है' या कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, "गौतम गंभीरने संघ व्यवस्थापनाशी लढा देऊन सॅमसनचा समावेश करण्याचा आग्रह धरला नसता, तर त्याची निवड शक्य नव्हती.
सॅमसन २०१४ पासून क्रिकेट खेळत आहे. २०१५ च्या सुमारास मी भारतात काम करत असताना त्याच्याबद्दल खूप चर्चा होती. मात्र, एमएस धोनी, दिनेश कार्तिक यांसारख्या यष्टिरक्षकांमुळे त्याला संधीसाठी बराच काळ वाट पाहावी लागली. आताही गंभीरने सर्वांशी लढून त्याला संघात स्थान मिळवून दिले आहे. त्याची निवड एका अर्थाने आक्रमकपणे करण्यात आल्याचेही शोएब याने सांगितले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत संजू सॅमसनने आतापर्यंत चार सामन्यांत ७७.३३ च्या सरासरीने आणि २०१.७३ च्या स्ट्राइक रेटने २३२ धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश असून ९७* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीसह सॅमसनने टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यात सर्वाधिक धावा करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कोहलीने २०१६ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावा केल्या होत्या.
या स्पर्धेत १६ षटकार ठोकून सॅमसनने एकाच विश्वचषक आवृत्तीत सर्वाधिक षटकार करण्याचा रोहित शर्माचा (२०२४ विश्वचषक स्पर्धा : १५ षटकार) विक्रमही मोडीत काढला आहे.