स्पोर्ट्स

Cricket SMAT : सर्फराजने किल्ला लढवला, पण सूर्यकुमारनेच घात केला..! मुंबईचा केरळकडून अवघ्या १५ धावांनी धक्कादायक पराभव

मुंबई संघाला संपूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत.

रणजित गायकवाड

Kerala vs Mumbai Syed Mushtaq Ali Trophy Sarfaraz Khan fifty Suryakumar Yadav flop

मुंबई : स्टार खेळाडूंची फौज मैदानात उतरवूनही मुंबईच्या संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये केरळविरुद्ध १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. केरळच्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सर्फराज खानने एकीकडे अर्धशतक झळकावूनही संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. विशेष म्हणजे, स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या संथ खेळीमुळे मुंबईच्या आशा संपुष्टात आल्या आणि त्यांना संपूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत.

केरळच्या गोलंदाजांचा मुंबईच्या फलंदाजांवर हल्लाबोल

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळच्या संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७८ धावा केल्या. केरळकडून कर्णधार संजू सॅमसनने (२८ चेंडूंत ४६ धावा, ८ चौकार, १ षटकार) आणि विष्णू विनोदने (४३ धावा) धमाकेदार सुरुवात केली. अखेरच्या षटकांमध्ये सैफुद्दीनने (१५ चेंडूंत ३५ धावा, ५ चौकार, २ षटकार) तुफान फटकेबाजी करत धावसंख्या १७८ पर्यंत पोहोचवली. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

सर्फराजचे अर्धशतक; पण 'सूर्या'ची बॅट शांत

१७९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईच्या संघाला तगडी सुरुवात आवश्यक होती. पण युवा आयुष महात्रे अवघ्या ३ धावांवर बाद झाला. यानंतर अनुभवी अजिंक्य रहाणेने १८ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ३२ धावांची तडफदार खेळी करत आशा निर्माण केल्या, पण तो विग्नेश पुथुरच्या जाळ्यात अडकला.

यानंतर मात्र सर्फराज खानने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने संयमी आणि गरजेनुसार वेगाने धावा करत संघाला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या टोकाला सूर्यकुमार यादवकडून (SKY) ज्या स्फोटक खेळाची अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. जेव्हा सरफराज वेगाने धावा करत होता, तेव्हा सूर्यकुमारने त्याला साथ देत मोठी भागीदारी करणे आवश्यक होते. पण सूर्याने २५ चेंडूंमध्ये फक्त ३२ धावांची खेळी केली आणि संघाचा रनरेट वाढू दिला नाही. त्याच्या या संथ खेळीमुळे मुंबईवर दडपण वाढले.

के.एम. आसिफची भेदक गोलंदाजी

सूर्यकुमार बाद झाल्यावर मुंबईची फलंदाजी गडगडली. शिवम दुबे (११) आणि साईराज पाटील (१३) वगळता मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. याचा फायदा घेत केरळच्या के.एम. आसिफने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले.

आसिफने ३.४ षटकांत केवळ २४ धावा देत पाच महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याला विग्नेश पुथुर (२ बळी) आणि इतरांनी उत्तम साथ दिली. परिणामी, मुंबईचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत केवळ १६३ धावांवर गारद झाला आणि केरळने १५ धावांनी विजय मिळवला.

पराभवाचे कारण

मुंबईकडे अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि सर्फराज खानसारखे 'स्टार' खेळाडू असूनही, मोठी धावसंख्या गाठताना सूर्यकुमार यादवची संथ खेळी आणि उर्वरित फलंदाजांचे अपयश टीमला महागात पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT