Karun Nair's big decision Suddenly the team were changed
भारतीय संघाचा फलंदाज करुण नायर सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तब्बल 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान, त्याने देशांतर्गत क्रिकेटबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आपल्या जुन्या संघात परतण्याची घोषणा केली आहे.
करुण नायरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात कर्नाटक संघाकडून केली होती. मात्र, खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर, 2023 मध्ये तो विदर्भ संघात सामील झाला होता. आता त्याने पुन्हा एकदा आपल्या मूळ संघात, अर्थात कर्नाटक संघात, परतण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी देशांतर्गत हंगामात नायर कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
‘क्रिकबझ’च्या वृत्तानुसार, वैयक्तिक कारणास्तव नायरने हा निर्णय घेतला असून, त्याला विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे. नायर सुमारे तीन वर्षांनंतर कर्नाटक संघाकडून खेळेल. 2022-23 च्या हंगामात त्याने कर्नाटक सोडून विदर्भ संघाची निवड केली होती. विदर्भाकडून खेळताना त्याने उत्कृष्ट कामगिरी करत रणजी करंडकाच्या एका हंगामात 863 धावा आणि विजय हजारे करंडकात 779 धावा केल्या होत्या. आता कर्नाटकसाठी तो हीच कामगिरी कायम ठेवतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
करुण नायर हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून त्रिशतक झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, त्रिशतकानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता 8 वर्षांनंतर संघात पुनरागमन केल्यानंतरही इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याने 3 कसोटी सामन्यांच्या 6 डावांत केवळ 131 धावा केल्या आहेत. या मालिकेत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 40 आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेट : नायरने आतापर्यंत 119 सामन्यांमध्ये 48.86 च्या सरासरीने 8601 धावा केल्या आहेत, ज्यात 24 शतकांचा समावेश आहे.
लिस्ट ए क्रिकेट (50 षटकांचे सामने) : त्याची आकडेवारी येथेही प्रभावी आहे. त्याने 107 सामन्यांमध्ये 41.15 च्या सरासरीने 3128 धावा केल्या असून, त्याच्या नावावर 8 शतके आहेत.