jaspreet bumrah's big statement on india test team captaincy
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी एक मोठा खुलासा केला आहे. ‘बीसीसीआयकडून भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा प्रस्ताव मिळाला होता, परंतु मी तो तो स्वतःहून नाकारला,’ असे स्पष्ट केले. वर्कलोड मॅनेजमेंटला प्राधान्य देत आणि संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे बुमराहने सांगितले. यामुळे शुभमन गिलला कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली, तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले. बुमराहने हा खुलासा स्काय स्पोर्ट्सवरील माजी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक यांच्याशी संवाद साधताना केला.
रोहित शर्माने 7 मे रोजी आणि त्यानंतर काही दिवसांनी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी चर्चा सुरू झाली होती. या शर्यतीत बुमराहचे नाव आघाडीवर होते. तो संघाचा उपकर्णधारही होता आणि यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया (2024-25) आणि इंग्लंड (2022) यांच्याविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते, त्यामुळे अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याला कर्णधारपदासाठी प्रथम पसंती दिली होती.
मात्र, बुमराहने आयपीएल 2025 दरम्यानच बीसीसीआयला आपली भूमिका स्पष्ट केली. त्याने आपल्या पाठीचे दुखणे आणि दीर्घकाळ क्रिकेट खेळण्यासाठी कार्यभार व्यवस्थापनाच्या गरजेमुळे कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे 24 मे रोजी बीसीसीआयने शुभमन गिलला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी (20 जूनपासून सुरू) कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले.
बुमराहने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘रोहित आणि विराटने निवृत्ती जाहीर करण्यापूर्वी, आयपीएल दरम्यान, मी बीसीसीआयशी चर्चा केली होती. मी टेस्ट मालिकेतील वर्कलोड मॅनेजमेंटबाबत बोललो. मी माझ्या फिटनेस टीमशी चर्चा केली. आपल्याला आणखी स्मार्ट निर्णय घ्यावे लागतील या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. त्यानंतर बीसीसीआयला मी कर्णधारपदासाठी तयार नसल्याचे कळवले. टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून बीसीसीआय माझ्याकडे पाहत होती. वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत मी इंग्लंड दौ-यातील सर्वच सामने खेळू शकेन याबाबत साशंकता होती. जी अजूनही आहे. अशातत आपण मोजक्याच सामन्यांमध्ये नेतृत्व करावे आणि उर्वरित सामन्यांमध्ये कोणीतरी दुस-याने ती जबाबदारी सांभाळावी हा निर्णय संघासाठी योग्य ठरणार नव्हता,’ असेही बुमराहने खुलासा केला.
बुमराहने कसोटी कर्णधारपद नाकारून आपल्या दीर्घकालीन कारकिर्दीला आणि संघाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. त्याच्या कार्यभार व्यवस्थापनाच्या निर्णयाने शुभमन गिलसाठी कर्णधारपदाचा मार्ग मोकळा झाला आणि आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराह खेळाडू म्हणून आपले योगदान देण्यास सज्ज आहे. त्याच्या प्रामाणिक आणि संघप्रथम दृष्टिकोनामुळे चाहत्यांचा त्याच्यावरील आदर वाढला आहे. 20 जूनपासून सुरू होणारी ही मालिका WTC 2025-27 च्या चक्रासाठी महत्त्वाची आहे. बुमराहच्या गोलंदाजीवर भारताच्या यशाची मोठी भिस्त असेल.