japan cricket team icc u19 men's cricket world cup 2026
दुबई : आयसीसी स्पर्धा खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेट संघ पाहतो, परंतु काही निवडक संघांचेच हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. यात याता जपानच्या क्रिकेट संघाने बाजी मारली आहे. जपान संघाने आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवली आहे. ईस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायरमध्ये सर्व 4 सामने जिंकत त्यांनी अंडर-19 विश्वचषकाचे तिकीट मिळवले.
जपानने क्वालिफायर फेरीत पीएनजी म्हणजेच पापुआ न्यू गिनी आणि फिजी या संघांविरुद्ध प्रत्येकी 2-2 सामने खेळले आणि सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला. अशा प्रकारे जपानचा संघ 8 गुणांसह अंडर-19 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा 14 वा संघ ठरला. प्रादेशिक क्वालिफिकेशनद्वारे अंडर-19 विश्वचषकात स्थान मिळवणारा तो तिसरा संघ आहे. यापूर्वी टांझानियाने आफ्रिका क्वालिफायर आणि अफगाणिस्तानने आशिया क्वालिफायर जिंकून आपली जागा पक्की केली आहे.
जपानने दुसऱ्यांदा अंडर-19 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी जपानच्या क्रिकेट संघाने 2020 मध्ये झालेल्या स्पर्धेत प्रथमच सहभाग घेतला होता, पण त्यांना 6 सामने खेळून एकही विजय मिळवता आला नव्हता. यावेळी जपानचा प्रयत्न स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्याबरोबरच आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वाला प्रभावित करण्याचा असेल.
आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचे आयोजन पुढील वर्षी झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होतील. आतापर्यंत 14 संघांनी या विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे. आता फक्त अमेरिका आणि युरोप क्षेत्रातून क्वालिफिकेशनद्वारे 2 संघ निश्चित होणे बाकी आहे.
अंडर-19 विश्वचषकात टॉप-10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांनी पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत आपली जागा आधीच पक्की केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश आहे. दरम्यान, झिम्बाब्वे यजमान म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल.
झिम्बाब्वे (यजमान), ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, भारत, वेस्ट इंडीज, आयर्लंड, पाकिस्तान, टांझानिया, अफगाणिस्तान, जपान