FIFA World Cup 2026 : बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात बैरानवंदने अनेक महत्त्वाचे बचाव करत इराणचे आव्हान जिवंत ठेवले.  Pudhari
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026 : "आम्ही आमच्या भूमीचे रक्षण..." ; विश्‍वचषकातील सामन्यानंतर इराणच्या संसद अध्यक्षांचा अमेरिकेवर हल्लाबोल

गोलकीपर बैरानवंद इराणसाठी ठरला संकटमोचक, अप्रतिम बचावांच्‍या जोरावर बेल्जियमला बरोबरीत रोखले

पुढारी वृत्तसेवा

FIFA World Cup 2026 : २८ फेब्रुवारी २०२६... अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि संपूर्ण जग अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले गेले! दिवसेंदिवस पेटत गेलेल्या या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था होरपळून निघाली. 'आता पुढे काय?' या भीतीने जगाचा श्वास रोखला गेला, अगदी आगामी फुटबॉल विश्वचषकावरही युद्धाचे सावट पसरले. मात्र, विश्वचषक सुरू असतानाच अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाला आणि जगाने मोकळा श्वास घेतला. याच धामधुमीत, अमेरिकेत सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत इराणचा संघ एका नव्या धैर्याने मैदानावर उतरला. रविवारी (दि.२१) बेल्जियमविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात इराणने कडवी झुंज देत सामना बरोबरीत सोडवला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर इराणच्या संसदेचे अध्यक्ष एम.बी. घलिबाफ यांनी गोलकीपर अलीरेझा बैरानवंद याच्या पाठीवर कौतुकाची थाप तर मारलीच, पण याच निमित्ताने थेट अमेरिकेवर घणाघाती शाब्दिक हल्ला चढवत राजकीय वातावरण पुन्हा तापवले आहे!

इराण संसदेचे अध्यक्षांनी केले गोलकीपर बैरानवंदचे जाहीर कौतुक

इराणचे संसदेचे अध्यक्ष एम.बी. घलिबाफ यांनी सोमवारी इराणचा गोलकीपर अलीरेझा बैरानवंद याचे जाहीर कौतुक केले. फिफा विश्वचषक २०२६ मधील 'ग्रुप जी' च्या बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात बैरानवंदने अनेक महत्त्वाचे बचाव करत इराणचे आव्हान जिवंत ठेवले. त्याच्या या कामगिरीचा गौरव करताना घलिबाफ यांनी, "आम्ही आमच्या भूमीचे रक्षण असेच करतो," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आम्ही आमच्या भूमीचे रक्षण असेच करतो"

'X' (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये, संसदेच्या अध्यक्षांनी 'ग्रुप जी' मधील इराणच्या या दुसऱ्या सामन्यातील एक छायाचित्र शेअर केले. या सामन्यात इराणने बलाढ्य बेल्जियमला ०-० अशा बरोबरीत रोखले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोलकीपरचे कौतुक करताना त्यांनी या पोस्टला "आम्ही आमच्या भूमीचे रक्षण असेच करतो" असे कॅप्शन दिले आहे.

बैरावनवंदने रोखले एकूण ७ गोल

रविवारच्या सामन्यात (स्थानिक वेळेनुसार) लॉस एंजेलिस स्टेडियमवर ३३ वर्षीय गोलकीपर बैरानवंदने केलेल्या अद्भूत कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. बैरानवंदने सामन्यात एकूण ७ गोल रोखले; ज्यामध्ये ४ डायव्हिंग स्टॉप्स (उडी मारून केलेले बचाव) आणि हवेतील ३ महत्त्वाचे कॅचेस समाविष्ट होते. त्याच्या या चपळतेमुळे बेल्जियमचे निश्चित मानले जाणारे जवळजवळ २ गोल टळले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे इराणला या सामन्यातून एक महत्त्वपूर्ण गुण मिळवता आला, तसेच बैरानवंदला 'सुपीरियर प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरविण्यात आले.

बैरानवंद इराणसाठी ठरला संकटमोचक

सामन्याच्या सुरुवातीला बेल्जियमने आक्रमक खेळ करत चेंडूवर आपले नियंत्रण राखले होते. मॅक्सिम डी क्यूपरने दूरवरून मारलेल्या एका शक्तिशाली शॉटवर बैरानवंदची कडक परीक्षा घेतली, परंतु इराणच्या या गोलकीपरने तो प्रयत्न तितक्याच ताकदीने हाणून पाडला.दुसरीकडे, इराणने प्रतिआक्रमणावर भर दिला. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला मेहदी तारेमीने फ्री-किकच्या एका चतुर चालीवर गोल करत इराणला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, व्हीएआर (VAR) च्या तपासणीनंतर हा गोल 'ऑफसाईड' ठरवून नाकारण्यात आला. पहिल्या सत्रात बेल्जियमच्या आक्रमकांनी इराणच्या बचावाचा वेध घेणे सुरूच ठेवले आणि गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु प्रत्येक वेळी बैरानवंद इराणसाठी संकटमोचक ठरला.

न्गोयला 'रेड कार्ड' बेल्‍जियम बॅकफूटवर

सामन्याच्या ६६ व्या मिनिटाला एक नाट्यमय वळण आले. बचावातील एका चुकीमुळे इराणचा स्ट्रायकर तारेमी थेट गोलच्या दिशेने धावत असताना बेल्जियमचा डिफेंडर नेथन न्गोयने त्याला चुकीच्या पद्धतीने पाडले. पंचांनी न्गोयला थेट 'रेड कार्ड' दाखवून मैदाबाहेर काढले. या विश्वचषकातील हे आठवे रेड कार्ड होते. या कारवाईमुळे बेल्जियमला उर्वरित सामन्यात बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला.मैदानावरील एका खेळाडूच्या अधिक संख्येचा फायदा घेत इराणने विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यांनी नवीन आक्रमक खेळाडू मैदानात उतरवले आणि बेल्जियमच्या बचावफळीवर सतत दबाव आणला. मात्र, शेवटच्या मिनिटांत लागोपाठ केलेल्या आक्रमणांनंतरही इराणला बेल्जियमचा भेद करता आला नाही.

'ग्रुप जी' मधील समीकरण अधिक रंजक

हा सामना बरोबरीत सुटल्याने 'ग्रुप जी' मधील समीकरण आता अत्यंत रंजक झाले आहे. इराण सध्या दोन गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर बेल्जियम दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि इजिप्त या दोन्ही संघांकडे प्रत्येकी एक गुण आहे. त्यामुळे ग्रुप स्टेजच्या शेवटच्या फेरीतील सामन्यांवरूनच या गटातून पुढील फेरीत कोण पात्र ठरणार, हे स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT