

FIFA World Cup 68 Year Old Record Broken as Four Group Stage Matches Finish Level on the Same Day
लॉस एंजेलिस : फिफा विश्वचषकात तब्बल ६८ वर्षांनंतर एकाच दिवशी चार सामने अनिर्णीत (ड्रॉ) सुटण्याचा अनोखा आणि ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी १५ जून १९५८ रोजी एकाच दिवशी असे चार सामने अनिर्णीत राहिले होते. यंदा एकाच दिवसात सोमवारी दिवसभरातील सर्व सामने अनिर्णीत राहिल्याने या आठवणीला उजाळा मिळाला. दिवसातील पहिल्या सामन्यात बलाढ्य स्पेनला नवख्या केप व्हर्डेने गोलशून्य रोखत मोठा उलटफेर केला. तर दुसरीकडे बेल्जियम-इजिप्त, उरुग्वे-सौदी अरेबिया आणि इराण-न्यूझीलंड यांच्यातील थरारक लढतीही बरोबरीत सुटल्याने फुटबॉल चाहत्यांना एकाच दिवशी हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
मियामी : मॅक्सिमिलियानो आरौझोने ८० व्या मिनिटाला केलेल्या महत्त्वपूर्ण गोलच्या जोरावर उरुग्वेने फिफा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाला १-१ अशा बरोबरीत रोखले. मियामी येथे झालेल्या या चुरशीच्या लढतीमुळे 'ग्रुप एच' मधील समीकरणे कमालीची रंजक बनली आहेत. या बरोबरीनंतर स्पेन, केप व्हर्डे, उरुग्वे आणि सौदी अरेबिया हे चारही संघ आता प्रत्येकी १ गुणासह गुणतालिकेत एकाच पातळीवर आले आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच उरुग्वेने चेंडूवर ताबा मिळवत आक्रमक पवित्रा घेतला. ५ व्या मिनिटाला मथियास व्हिनाच्या पासवर आरौझोचा शॉट गोलपोस्टच्या बाहेर गेला. ३० व्या मिनिटाला आरौझोच्या पासवर फेडेरिको व्हिनासने केलेला हेडरचा प्रयत्न सौदीचा गोलकीपर मोहम्मद अल-ओवैसने लीलया हाणून पाडला. ३८ व्या मिनिटाला उरुग्वेच्या फर्नांडो मुस्लेराने अब्दुलेल्लाह अल-अमरीचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, अवघ्या ३ मिनिटांनंतर (४१ व्या मिनिटाला) अल-अमरीने क्लोज-रेंजवरून थेट गोल करत सौदी अरेबियाला १-० अशी अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत सौदीने ही आघाडी कायम ठेवली.
दुसऱ्या हाफमध्ये उरुग्वेने अधिक आक्रमक खेळ केला. रिअल माद्रिदचा स्टार फेडेरिको वाल्व्हर्डे आणि मॅन्युएल उगारते यांनी सौदीच्या बचावफळीवर प्रचंड दडपण आणले; पण सौदीचा गोलकीपर अल-ओवैस भिंतीसारखा उभा राहिला. अखेर ८० व्या मिनिटाला उरुग्वेच्या आक्रमणाला यश आले. व्हिनासचा हेडर अल-ओवैसने अडवला; मात्र रिबाऊंड झालेला चेंडू आरौझोच्या पायाशी आला आणि त्याने तो थेट जाळ्यात धाडला. अंतिमत: १-१ हाच गोलफरक कायम राहिला व लढत बरोबरीत सुटली.
सिटल : रोमेलु लुकाकूने मैदानात पाऊल ठेवताच अवघ्या २२ सेकंदात घडवून आणलेल्या आत्मघातकी गोलच्या जोरावर बेल्जियमने फिफा विश्वचषकात इजिप्तला १-१ अशा बरोबरीत रोखले. सिटल येथे झालेल्या या थरारक सामन्यात इमाम अशुअरच्या गोलमुळे इजिप्त पहिल्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र, उत्तरार्धात आलेल्या लुकाकूच्या दबावामुळे इजिप्तच्या मोहम्मद हानीकडून स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये चूक झाली आणि इजिप्तच्या हातात आलेला विजय निसटला.
हा सामना मँचेस्टर सिटीचा केविन डी ब्रुयने आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह या प्रीमियर लीगच्या दोन दिग्गजांमधील लढाई म्हणून पाहिला जात होता. ३४ वा वाढदिवस साजरा करणार्या इजिप्तचा कर्णधार मोहम्मद सलाहने १९ व्या मिनिटाला डाव्या विंगकडून सुरेख पास दिला. या पासवर इमाम अशुअरने कोणतीही चूक न करता बेल्जियमचा गोलकीपर थिबॉत कोर्टुआला चकवून गोल केला आणि इजिप्तला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या असिस्टसह सलाह विश्वचषकात स्वतःच्या वाढदिवशी गोलमध्ये योगदान देणारा १९६६ नंतरचा पहिला आफ्रिकन खेळाडू ठरला.
उत्तरार्धात इजिप्तच्या झिको आणि ओमार मरमुश यांनी आघाडी दुप्पट करण्याचे प्रयत्न केले; पण बेल्जियमच्या बचावफळीने ते हाणून पाडले. ६५ व्या मिनिटाला बेल्जियमने स्टार स्ट्रायकर रोमेलु लुकाकूला मैदानात उतरवले. मैदानात आल्यावर अवघ्या २२ सेकंदांच्या आत, थॉमस म्युनियरच्या क्रॉसवर लुकाकूने आणलेल्या दबावामुळे इजिप्तच्या मोहम्मद हानीकडून आत्मघातकी गोल झाला आणि सामना १-१ अशा बरोबरीत आला. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना ब्रँडन मेशेलेचा हेडर इजिप्तचा गोलकीपर मोस्तफा शोबियरने अप्रतिमरीत्या अडवला, तर लुकाकूची एक सुवर्णसंधी हुकली. ५ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेनंतरही ही कोंडी फुटू शकली नाही.
लॉस एंजेलिस : फिफा विश्वचषकाच्या आपल्या पहिल्याच सलामीच्या सामन्यात इराणने न्यूझीलंडविरुद्ध कमालीचा संघर्ष करत २-२ अशी थरारक बरोबरी साधली. लॉस एंजेलिस येथील प्रसिद्ध सोफाय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत दोन्ही संघांनी पूर्वार्ध आणि उत्तरार्धात आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. शेवटच्या मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही बाजूंनी झालेल्या गोलमुळे चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यामुळे पूर्वार्धाचा खेळ कमालीचा चुरशीचा ठरला. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी रणनीती बदलत अधिक आक्रमक पवित्रा घेतला. इराणच्या आघाडीच्या फळीने न्यूझीलंडच्या डी-बॉक्समध्ये सतत घिरट्या घालत २ गोल डागले. मात्र, न्यूझीलंडनेही हार न मानता इराणच्या भक्कम बचावफळीला भेदण्यात यश मिळवले आणि २ गोल करून सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. दोन्ही संघांच्या गोलकीपर्सनी शेवटच्या क्षणांमध्ये केलेले उत्कृष्ट बचाव यामुळे हा सामना बरोबरीत सुटला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुणावर समाधान मानावे लागले.