स्पोर्ट्स

IPL Auction Update : आयपीएल लिलावासाठी १२२० खेळाडू सज्ज; मात्र ६६ जागांसाठीच रंगणार बोलीचा थरार!

१६ डिसेंबरला गोव्यात लिलावाचा थरार, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सर्वाधिक सहभाग

रणजित गायकवाड

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या लिलावासाठी तब्बल १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली असून, त्यामध्ये १७ देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू लिलावाच्या रिंगणात उतरले असले, तरी प्रत्यक्षात केवळ ६६ खेळाडूंनाच संघांमध्ये स्थान मिळणार आहे. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह नवोदित खेळाडूंनाही संधीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बीसीसीआयकडून लिलावापूर्वी खेळाडूंच्या नोंदणी यादीची छाननी होण्याची शक्यताही आहे.

१६ डिसेंबरला गोव्यात लिलावाचा थरार

आगामी आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यात पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये ९३९ भारतीय, तर १७ देशांतील २८१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

लिलावापूर्वी झालेल्या खेळाडू कायम ठेवण्याच्या (रिटेन्शन) प्रक्रियेत दहा फ्रँचायझींनी मिळून १८४ खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता सर्व संघांकडे मिळून केवळ ६६ जागा रिक्त आहेत. यापैकी २५ जागा परदेशी खेळाडूंसाठी उपलब्ध असतील. उर्वरित जागांवर भारतीय खेळाडूंना संधी मिळू शकते. त्यामुळे मर्यादित जागांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सर्वाधिक सहभाग

लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये १८४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले (कॅप्ड), ९९४ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणाची संधी न मिळालेले (अनकॅप्ड) आणि ४२ असोसिएट देशांतील खेळाडूंचा समावेश आहे.

अनकॅप्ड खेळाडूंमध्ये ९२५ भारतीय खेळाडू आहेत. यातील १२७ खेळाडूंनी यापूर्वी आयपीएलच्या हंगामात सहभाग घेतला आहे. परदेशी खेळाडूंच्या नोंदणीमध्ये ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली असून, तेथील सर्वाधिक ५३ खेळाडूंनी लिलावासाठी नावे दिली आहेत. दक्षिण आफ्रिकेचे ४०, वेस्ट इंडिजचे ३६, न्यूझीलंडचे २५ आणि अफगाणिस्तानचे २३ खेळाडू लिलावाच्या शर्यतीत आहेत.

असोसिएट देशांमधूनही खेळाडूंनी उत्साहाने नोंदणी केली आहे. अमेरिकेचे १३, तर संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि नेपाळचे प्रत्येकी १० खेळाडू लिलावासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या लिलावात विविध देशांतील खेळाडूंचे प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे.

दिल्ली-मुंबईकडे सर्वाधिक जागा रिक्त

लिलावात कोणत्या संघाला किती खेळाडूंची गरज आहे, यावरही सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांकडे सर्वाधिक प्रत्येकी नऊ जागा रिक्त आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना लिलावात मोठ्या प्रमाणात खेळाडूंची खरेदी करावी लागणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सला आठ, तर लखनौ सुपर जायंट्सला सात खेळाडूंची आवश्यकता आहे. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांकडे प्रत्येकी सहा जागा रिक्त आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पाच, तर गुजरात टायटन्सला केवळ तीन खेळाडूंची गरज आहे.

एकीकडे १,२२० खेळाडूंची मोठी यादी, तर दुसरीकडे केवळ ६६ उपलब्ध जागा, असे चित्र यंदाच्या लिलावात असणार आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर फ्रँचायझी मोठी बोली लावणार आणि कोणाला संधीपासून वंचित राहावे लागणार, याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT