IPL 2026 Playoff Schedule Announced: IPL 2026 च्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची नावे अखेर निश्चित झाली आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB), गुजरात टायटन्स (GT), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या लीग सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत चौथ्या स्थानावर कब्जा केला.
आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष प्लेऑफ सामन्यांकडे लागले असून, कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचणार आणि ट्रॉफी जिंकणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया IPL 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक, सामने, मैदानं आणि वेळ.
IPL 2026 गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये क्वालिफायर 1 रंगणार आहे. विद्यमान विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ गुजरात टायटन्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
हा सामना 26 मे 2026 (मंगळवार) रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
या सामन्याचा विजेता थेट IPL 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये आणखी एक संधी मिळेल.
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा स्पर्धेतील प्रवास संपणार आहे.
हा सामना 27 मे 2026 (बुधवार) रोजी मुल्लांपूर, न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. सामन्याची वेळ संध्याकाळी 7:30 वाजता आहे.
या सामन्याचा विजेता क्वालिफायर 2 मध्ये खेळेल, जिथे त्याचा सामना क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाशी होईल.
क्वालिफायर 2 सामना 29 मे 2026 रोजी न्यू चंदीगडमधील याच मैदानावर होणार आहे. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत पोहोचेल. तर IPL 2026 ची बहुप्रतिक्षित फायनल 31 मे 2026 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.
आता प्लेऑफमध्ये कोण बाजी मारणार, RCB पुन्हा ट्रॉफी जिंकणार की SRH, GT किंवा राजस्थान रॉयल्स इतिहास रचणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.