

मुंबई : वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 30 धावांनी पराभव करत या विजयासह यंदाच्या आयपीएल हंगामातील प्ले-ऑफचे चौथे आणि शेवटचे तिकीट निश्चित केले. आर्चरने आधी फलंदाजीत अवघ्या 15 चेंडूंत 32 धावांची वादळी खेळी केली आणि नंतर गोलंदाजीत आपल्या 4 षटकांच्या कोट्यात अवघ्या 17 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी टिपले. आर्चरच्या या अष्टपैलू ‘शो’मुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 205 धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी शेवटच्या 5 षटकांत केलेला स्वैर मारा राजस्थानच्या पथ्यावर पडला. आर्चरच्या 15 चेंडूंतील 32 धावांच्या उपयुक्त खेळीमुळे राजस्थानला दोनशेपार मजल मारता आली.
206 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. ‘पॉवर प्ले’च्या पहिल्या 6 षटकांत मुंबईने अवघ्या 49 धावांत 4 बडे फलंदाज गमावले आणि इथेच सामन्याचे चित्र जवळपास निश्चित झाले. आर्चरने रोहित शर्माला (0) चकवा देत पहिले यश मिळवले व नंतर पाठोपाठ तिसऱ्या षटकात नमन धीरचा (6) त्रिफळा उडवला. त्यानंतर नांद्रे बर्गरने रायन रिकल्टनला (12) वैभव सूर्यवंशीकरवी झेलबाद करून मुंबईचे कंबरडेच मोडले. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या तिलक वर्माला ब्रिजेश शर्माने पायचीत केले. त्यामुळे मुंबईची अवस्था 4 बाद 38 अशी बिकट झाली होती.
या बिकट परिस्थितीतून सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 63 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान राजस्थानच्या ब्रिजेश शर्माने सुमार क्षेत्ररक्षण केले. जीवदानाचा फायदा घेत सूर्यकुमारने 42 चेंडूंत 60 धावांची (4 षटकार, 3 चौकार) अर्धशतकी खेळी केली, तर विल जॅक्सने 18 चेंडूंत 33 धावांचे योगदान दिले. शेवटच्या 30 चेंडूंत मुंबईला 59 धावांची गरज होती आणि हार्दिक पंड्या 15 चेंडूंत 34 धावा करून क्रीजवर होता. 16 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जोफ्रा आर्चरविरुद्ध संयम राखण्याऐवजी हार्दिकने आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला. यातच तो बाद झाल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा पूर्णपणे मावळल्या.
प्रारंभी, फलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्रारंभी निर्धारित 20 षटकांत 8 बाद 205 अशी मजबूत धावसंख्या उभारली. आघाडी फळी गडगडली असली तरी राजस्थानने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत 200 धावांचा टप्पा पार केला. जोफ्रा आर्चरने अवघ्या 15 चेंडूंत 32 धावांची आक्रमक खेळी साकारली तर रवींद्र जडेजा (नाबाद 19) आणि नांद्रे बर्गर (नाबाद 10) यांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानच्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या जोडीला मुंबईच्या दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी अचूक गोलंदाजी करत दबावाखाली ठेवले. सेट होत असलेल्या जैस्वालला (27) विल जॅक्सने बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पुढच्याच षटकात चहरने फॉर्मात असलेल्या सूर्यवंशीला 4 धावांवर बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला होता.
राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 8/205. ध्रुव ज्युरेल 29 चेंडूंत 38, आर्चर 15 चेंडूंत 32, दासून शनाका 15 चेंडूंत 29, जैस्वाल 17 चेंडूंत 27. शार्दूल, दीपक चहर प्रत्येकी 2 बळी.
मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 9/175. (सूर्यकुमार यादव 42 चेंडूंत 3 चौकार, 4 षटकारांसह 60, हार्दिक पंड्या 34, विल जॅक्स 33. आर्चर 3/17, बर्गर, ब्रिजेश, यश राज प्रत्येकी 2 बळी).
फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर लक्षवेधी योगदान देणारा राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर त्याने गळ्यात घातलेल्या जाड सोन्याच्या साखळीमुळे या सामन्यातही चर्चेत राहिला. तो घालत असलेल्या या सोनसाखळीचे वजन तब्बल 1 किलोग्रॅमच्या आसपास असून त्याची किंमत अंदाजे 1,25,000 पौंड (भारतीय चलनानुसार 1.5 कोटी रुपये) इतकी आहे. ही साखळी ‘प्रॅगनेल’ या नामांकित ब्रँडने हिऱ्यांचा वापर करून खास त्याच्यासाठी तयार केली आहे. आश्चर्य म्हणजे इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्यावेळी मात्र आर्चरने पाकिस्तानात चोरी होऊ नये, म्हणून ही सोनसाखळी तेथे नेणे प्राधान्याने टाळले होते!
प्रारंभी, आघाडीवीरांच्या अपयशामुळे लडखडणारा राजस्थान रॉयल्सचा संघ शेवटच्या 5 षटकांत मात्र तब्बल 73 धावांची आतषबाजी करण्यात यशस्वी ठरला आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. एकदा राजस्थानने 200 धावांचा टप्पा पार केल्यानंतर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ कोणत्याच टप्प्यावर विजयाच्या आसपासही फिरकू शकला नाही.
26 मे : आरसीबी वि. गुजरात (क्वालिफायर-1) : सायं. 7.30 वा. : धर्मशाळा
27 मे : राजस्थान वि. हैदराबाद (एलिमिनेटर) : सायं. 7.30 वा. : चंदीगढ
29 मे : दुसरी क्वॉलिफायर : सायं. 7.30 वा. : चंदीगढ
31 मे : फायनल : सायं. 7.30 वा. : अहमदाबाद