

Travis Head’s Family Trolled: IPL 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या हायव्होल्टेज सामन्यानंतर एक वेगळाच वाद चर्चेत आला आहे. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यात मैदानावर वाद झाला होता. मात्र सामन्यानंतर सोशल मीडियावर हा विषय अधिकच तापला आणि त्याचा फटका थेट ट्रेविस हेडच्या कुटुंबालाही बसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२२ मे रोजी झालेल्या या सामन्यात RCB फलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. सनरायझर्सच्या गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी सुरू असताना विराट कोहलीने मिडविकेटवर उभ्या असलेल्या ट्रेविस हेडकडे इशारा करत त्याला गोलंदाजी करण्याचे आव्हान दिल्यासारखे दिसले.
समालोचकांच्या मते, कोहली मजेशीर अंदाजात “चल, थोडी ऑफस्पिन टाक” असे म्हणताना दिसला. कॅमेऱ्यात कोहली अनेकदा हेडकडे पाहून काही बोलताना दिसला, तर ट्रेविस हेडही हसत प्रतिक्रिया देताना दिसला.
मात्र खरी चर्चा सामन्यानंतर सुरू झाली. पोस्ट-मॅच हँडशेकदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये विराट कोहली ट्रेविस हेडशी हस्तांदोलन न करताच पुढे गेल्याचे दिसत होते. कोहलीने मागे उभ्या असलेल्या ईशान किशनशी हस्तांदोलन केले, पण हेडकडे दुर्लक्ष केल्याचा दावा सोशल मीडियावर केला गेला. यानंतर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.
या संपूर्ण प्रकरणावर ट्रेविस हेडची पत्नी जेसिका हेड हिने नाराजी व्यक्त केली आहे. तिने सांगितले की, “2023 च्या वर्ल्ड कप फायनलनंतर जसं वातावरण तयार झालं होतं, तसंच आता पुन्हा होत आहे. आम्ही ठीक आहोत, पण लोक आमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना लक्ष्य करत आहेत.”
ती पुढे म्हणाली, “खेळाबद्दलची आवड आणि भावना असणं चांगलं आहे. पण खेळाडूंच्या मागे कुटुंब आणि माणसं असतात, हे विसरता कामा नये. ऑनलाइन वर्तन आणि मानसिक आरोग्याबाबत गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे.”
जेसिकाने हेही सांगितले की, 2023 वर्ल्ड कप फायनल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि बॉक्सिंग डे टेस्टनंतरही त्यांच्या कुटुंबाला अशाच प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, सनरायझर्स हैदराबादने RCB वर पूर्ण वर्चस्व गाजवलं. अभिषेक शर्माने 22 चेंडूत 56 धावा, तर ईशान किशनने 79 धावा आणि हेनरिक क्लासेनने 51 धावा करत संघाला मोठा स्कोअर उभारून दिला. SRH ने 20 षटकांत 255 धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात RCB ची सुरुवात खराब झाली. विराट कोहली केवळ 15 धावा करून बाद झाला. रजत पाटीदारने 56 आणि वेंकटेश अय्यरने 44 धावा केल्या, पण संघ लक्ष्याच्या जवळही पोहोचू शकला नाही. अखेरीस SRH ने हा सामना 55 धावांनी जिंकला.