IPL 2026 Mini Auction: आयपीएल २०२६ च्या हंगामासाठीचा मिनी लिलाव हा आज (दि १६ डिसेंबर) रोजी अबू धाबीत होत आहे. मिनी ऑक्शनपूर्वी कोणाला किती बोली लागणार यंदा जुने सर्वोच्च बोलीचे रेकॉर्ड तुटणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या चर्चेत एका नियमाची चर्चा देखील जोर धरू लागली आहे.
हा नियम विदेशी खेळाडूंच्या बाबतीत आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या नियमानुसा मिनी ऑक्शनमध्ये कोणताही विदेशी खेळाडू हा १८ कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई करू शकत नाही. जरी फ्रेंचायजीनं त्यांच्यावर यापेक्षाही जास्त बोली लावली तरी एवढीच रक्कम त्यांना मिळणार आहे. (IPL 2026 Auction Rules)
आयपीएल मिनी लिलावात जरी परदेशी खेळाडूंना १८ कोटी रूपयांच्या वरची बोली लागली तरी त्या खेळाडूला १८ कोटी रूपयेच मिळणार आहेत. हा नियम आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावावेळी पहिल्यांदा लागू करण्यात आला होता. आता हा नियम यंदाच्या मिनी लिलावासाठी लागू करण्यात आला आहे. या नियमाचा उद्येश हा आर्थिक शिस्त कायम ठेवणे हा आहे. मिनी लिलावात सर्वोच्च बोली लागते याला आळा घालण्यासाठीच हा नियम लागू करण्यात आला आहे.
आता हे उदाहरणासह स्पष्ट समजून घेऊयात.... जर ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनला मिनी लिलावात ३० कोटी रूपयांची बोली लागली तरी त्याची आयपीएल सॅलरी ही १८ कोटी रूपयेच असणार आहे. उरलेले १२ कोटी रूपये हे बीसीसीआयच्या वेलफेअर फंडात जमा होणार आहेत. मात्र फ्रेंचायजीला ३० कोटी रूपये ही पूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे.
यंदाच्या मिनी लिलावात कोलकाता नाईट राडर्सच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा आहे. त्यांच्या पर्समध्ये ६४.३ कोटी रूपये शिल्लक आहेत. तर पाच वेळचे आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये ४३.६ कोटी रूपये असून मिनी लिलावात या दोन संघांचाच दबदबा असण्याची दाट शक्यता आहे. मात्र असं असलं तरी विदेशी खेळाडूंना १८ कोटीच्या वर रक्कम मिळणार नाहीये.
विशेष म्हणजे हा नियम फक्त परदेशी खेळाडूंनाच लागू असणार आहे. भारतीय खेळाडूंना जेवढी बोली लागेल तेवढे पूर्ण पैसे मिलणार आहेत. उदाहरणार्थ जर एखाद्या भारतीय खेळाडूला ३० कोटी रूपये बोली लागली तर त्याला पूर्ण ३० कोटी रूपये मिळणार आहेत.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ऋषभ पंतवर सर्वाधिक बोली लागली होती. लखनौ सुपर जायंट्सने त्याला २७ कोटी रूपये देऊन खरेदी केला होता. त्याला त्याची पूर्ण सॅलरी मिळणार आहे. गेल्या लिलावात ऋषभ पंत हा इतिहासातील सर्वात जास्त बोली लागणारा खेलाडू ठरला होता. आता यंदाच्या मिनी लिलावात हा विक्रम कोण मोडतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.