

सिडनी; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात रविवारी (दि. 14) बॉन्डी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली असून, हल्लेखोर हे पिता-पुत्र असल्याचे समोर आले आहे. ते मूळचे पाकिस्तानी असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृतांची संख्या वाढून 16 झाली आहे. मृतांमध्ये 10 वर्षांची एक मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय 45 जण जखमी झाले आहेत.
रविवारी बॉन्डी बीचवर हनुक्का सण साजरा करणार्या ज्यू नागरिकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी 50 वर्षांचा साजीद अक्रम याला घटनास्थळीच गोळ्या घालून ठार केले. त्याच्यासोबत गोळीबार करणारा त्याचा 24 वर्षांचा मुलगा नाविद अक्रम पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला असून, तो सध्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे. 24 वर्षांचा दहशतवादी नाविद अक्रम स्नायपर रायफलने लोकांना लक्ष्य करत असल्याचेही समोर आले आहे.
साजीद अक्रम 1998 मध्ये विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियात आला होता. त्याने वेरेना नावाच्या ऑस्ट्रेलियन महिलेबरोबर लग्न केले आणि नंतर त्याचा व्हिसा पार्टनर व्हिसामध्ये रूपांतरित झाला. त्यानंतर तो रेसिडेंट रिटर्न व्हिसावर ऑस्ट्रेलियात राहत होता. म्हणजेच, साजीद अक्रमकडे ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नव्हते. बर्क यांनी हे स्पष्ट केले नाही की, अक्रम ऑस्ट्रेलियात नेमका कुठे स्थायिक झाला होता, याची माहिती नाही. मात्र, तो पाकिस्तानातून आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी साजीद आणि नाविद अक्रम यांच्या भाड्याच्या घरावर छापा टाकून दोन बंदुका जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 50 वर्षांच्या साजीद अक्रमकडे परवाना असलेली बंदूक होती, जी तो शिकारीसाठी वापरत असे. साजीद अक्रमकडे कायदेशीररीत्या 6 बंदुका होत्या. गोळीबारासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी पिता-पुत्राने कुटुंबीयांना ‘आम्ही मासेमारीसाठी जात आहोत,’ असे सांगितले होते. हल्ल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या भाड्याच्या घरावर छापा टाकला.