ipl 2025 chennai super kings head coach stephen fleming press conference
चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आपल्या संघाच्या खराब कामगिरीबद्दल उघडपणे मत व्यक्त केले आहे. त्यांनी राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर, ‘यंदाच्या हंगामात सीएसकेने सुरुवातीपासून अपेक्षेप्रमाणे खेळा केला नाही. सर्वच बाबतीत आमच्या संघाने निराशा केली. त्यामुळे हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी राहण्यास पात्र होता,’ असे परखड विधान केले.
पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी झाली. या हंगामात, चेन्नईने मुंबईविरुद्धच्या दणदणीत विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली पण नंतर सलग पराभव पत्करावा लागला आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. मंगळवारी चेन्नईने राजस्थानविरुद्ध खेळताना या हंगामातील दहावा सामना गमावला. आता संघाचा फक्त एकच सामना शिल्लक आहे आणि तो जिंकला तरी ते दहाव्याच स्थानावर राहणार आहेत. आयपीएलच्या इतिहासाच्या गुणतालिकेत तळ गाठण्याची सीएसकेची ही पहिलीच वेळ आहे.
राजस्थान रॉयल्सकडून 6 विकेटनी पराभव झाल्यानंतर, फ्लेमिंग म्हणाले की, ‘सीएसकेला कधीही निराश होणे आवडत नाही. आमचा हेतू प्रत्येक हंगामात चांगले खेळण्याचा आहे. आम्ही हंगामातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. कदाचित आम्ही यावेळी अशा परिस्थितीला पात्र होतो कारण आम्ही अत्यंत खराब खेळलो. हे टाळण्याचा कोणताही मार्ग नव्हता.’
संघाच्या वाईट स्थितीचा उल्लेख करताना, फ्लेमिंग म्हणाले, ‘संघाच्या अपयशाचे मुख्य कारण टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी केलेली खराब कामगिरी. संघाची रणनीती पुन्हा मजबूत करावी लागेल. पुढील हंगामासाठी आमच्याकडे एक ठोस योजना तयार आहे. यावेळी आम्हाला सलामीवीर आणि टॉप ऑर्डरकडून चांगली सुरुवात मिळाली नाही, ज्याची उणीव संपूर्ण हंगामात जाणवली. आम्ही फक्त काही सामन्यांमध्येच चांगली कामगिरी करू शकलो.’
या निराशाजनक हंगामात सीएसकेसाठी आशेचा किरण म्हणजे वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज. त्याने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघात निवडही झाली आहे. फ्लेमिंग म्हणाले, ‘अंशुलचा गोलंदाजीचा वेग सुमारे 138-139 किमी प्रतितास आहे. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची अचूक लेन्थ. त्याने सपाट विकेटवरही चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या सीम आणि स्विंग परिस्थितीत तो आणखी प्रभावी ठरेल.’