बेंगळुरू : आयपीएलच्या 18 व्या हंगामात विराट कोहलीची बॅट चांगली तळपत आहे. स्पर्धेचा 52 वा सामना शनिवारी (दि. 3) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. येथे डावाची सुरुवात करताना कोहलीने 33 चेंडूत 62 धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. यासह त्याने आयपीएलच्या चालू हंगामात 500 धावांचा टप्पा पार केला. आतापर्यंतच्या हंगामात त्याने 11 सामने खेळले असून यादरम्यान त्याच्या बॅटमधून 63.13 च्या सरासरीने 505 धावा झळकल्या आहेत.
चालू हंगामात 500 धावांचा आकडा गाठून कोहलीने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा 500+ धावा करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. यापूर्वी तो ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. पण आता कोहली त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेला आहे.
8 वेळा : विराट कोहली (भारत)
7 वेळा : डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
6 वेळा : केएल राहुल (भारत)
5 वेळा : शिखर धवन (भारत)
सीएसकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 62 वे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने डावाची सुरुवात करताना एकूण 33 चेंडूंचा सामना करत 187.88 च्या स्ट्राईक रेटने 62 वसूल केल्या. दरम्यान, क्रिकेटप्रेमींना त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि पाच उत्कृष्ट षटकार पाहायला मिळाले.
कोहली आता आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. सीएसकेविरुद्ध त्याच्या एकूण 1146 धावा झाल्या आहेत. याबाबतीतही त्याने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 1134 धावा केल्या आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1130 धावांसह कोहली तिसऱ्या स्थानावरही आहे.
कोहलीने सीएसकेविरुद्ध 10 व्यांदा 50+ धावांची इनिंग खेळली. आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्ध सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या यादीत त्याने शिखर धवन, रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकले. या तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी नऊ वेळा अशी कामगिरी केली आहे.
विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. चेन्नईविरुद्ध आरसीबीची ही दुसरी सर्वोच्च सलामी ठरली. 2021 मध्ये कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी शारजाह येथे 111 धावांची सलामी दिली होती.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पाच षटकार ठोकले. यासह, तो टी-20 क्रिकेटमध्ये एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याचे आतापर्यंत 154 टी-20 षटकार झाले आहेत. याबाबतीत त्याने ख्रिस गेलला मागे टाकले. गेलने चिन्नास्वामी स्टेडियमवर 151 षटकार खेचले आहेत.