मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका निर्णायक टप्प्यावर असतानाच, उभय संघांमधील तीन सामन्यांच्या बहुप्रतिक्षित एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) येत्या २३ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत टीम इंडियाची घोषणा करू शकते. या घोषणेकडे केवळ चाहत्यांचेच नव्हे, तर क्रिकेट तज्ज्ञांचेही लक्ष लागून राहिले आहे, कारण संघात एका मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या भारतीय कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिल यांच्याकडे आहे. पण मानेच्या दुखापतीमुळे त्याच्या वनडे मालिकेतील सहभागावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात गिलच्या मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्याच सामन्यातून माघार घ्यावी लागली. गिल दुसऱ्या कसोटीतही खेळू शकणार नाही, असा अंदाज आहे.
गिलच्या दुखापतीची नेमकी तीव्रता स्पष्ट झालेली नाही. असे असले तरी, बीसीसीआय या महत्त्वाच्या खेळाडूबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. गिल हा भारतीय क्रिकेटचे 'लॉन्ग टर्म' भविष्य मानले जात असल्याने, त्याला अनफिट अवस्थेत मैदानात उतरवणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे, गिल द. आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतूनही बाहेर राहण्याची दाट शक्यता आहे.
‘गिलच्या दीर्घकालीन कारकिर्दीचा विचार करून बीसीसीआय कोणताही धोका पत्करणार नाही. फिट नसलेल्या गिलला खेळवणे संघासाठी आणि त्याच्यासाठीही धोकादायक ठरू शकते,’ असे तज्ज्ञांचे मत आहे.
जर शुभमन गिल वनडे मालिकेतून बाहेर पडला, तर बीसीसीआयला वनडे मालिकेसाठी नवा कर्णधार नेमावा लागेल. टीम इंडियामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन अनुभवी दिग्गज खेळणार आहेत. मात्र, बीसीसीआय पुन्हा त्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात कर्णधारपद देण्याची शक्यता फारच कमी आहे.
ऑस्ट्रेलिया दौ-यातील वन-डे मालिकेत श्रेयस अय्यर उपकर्णधार होता, पण तो देखील दुखापतग्रस्त झाला. श्रेयस द. आफ्रिकेविरुद्धची वन-डे मालिका खेळू शकेल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत, बीसीसीआयकडे केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोन पर्याय कर्णधारपदासाठी आहे असे मानले जात आहे. राहुलने मागील काळात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तर युवा आणि आक्रमक कर्णधार म्हणून पंचीची ओळख आहे. जर गिल मालिकेतून बाहेर राहिला, तर या दोघांपैकी एकाकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.