निमिष पाटगावकर
प्रवास अंतिम फेरीपर्यंतचा...
शिवम दुबेच्या अंतिम षटकात चेंडूचा टप्पा आणि वेगापेक्षा त्याच्या पायाचे आणि क्रीजचे नाते महत्त्वाचे होते. एकही नो बॉल न टाकता त्याने ते षटक टाकले आणि भारत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. या आधी पाकिस्तानने 2007 आणि 2009 ला, तर श्रीलंकेने 2012 आणि 2014 ला ही कामगिरी केली आहे. भारत या पंक्तीत येऊन बसला आहे आणि आतापर्यंत कुणीही न केलेली कामगिरी म्हणजे सलग दोनदा विश्वचषक जिंकण्याची कामगिरी करायच्या उद्देशाने रविवारी आपला संघ मैदानात उतरेल.
सलग दोन विश्वचषक आपण म्हणत असलो, तरी 2024 च्या अंतिम सामन्यातील सूर्या, बुमराह, पंड्या, अक्षर, दुबे, कुलदीप आणि अर्शदीप हे सहा खेळाडूच यंदाच्या संघात आहेत. तेव्हा या नव्या संघाला नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने इथपर्यंत कसे आणले आणि अंतिम सामन्यात काय योजना असतील, याचा आढावा घेऊ या. विश्वचषकाचे ग्रुप आणि वेळापत्रक जाहीर झाले तेव्हाच भारताचा सुपर-8 फेरीतील प्रवेश नक्की झाला होता. यूएसए, नामिबिया, नेदरलँड आणि पाकिस्तान यांच्यात भारताला टक्कर देणारे कुणीच नव्हते. भारत-पाकिस्तान लढत आपण मीडियात धर्मयुद्ध, महामुकाबला वगैरे नावे देऊन रंगवतो; पण प्रत्यक्षात पाकिस्तानचा संघ मैदानावर फुसका बार आहे, हे आपण गेल्या काही वर्षांत कायमच बघत आलो आहोत. भारताने हे चारही विजय सहज मिळवावेत, असे वाटत असताना पहिल्याच सामन्यात यूएसए विरुद्ध आपण धोक्याची घंटा अनुभवली. भारताने त्या सामन्यात बळी जरी मध्यमगती गोलंदाज शॅल्वीकला दिल्या, तरी फिरकीपटू मोहम्मद मोहसीनच्या लेगब्रेक गुगली आणि हरमीत सिंगच्या डावखुऱ्या फिरकीने आपल्या फलंदाजांना चांगलेच जखडवले. यानंतर आपली फलंदाजी ऑफ स्पिन गोलंदाजीविरुद्ध अडखळली. नामिबियाच्या इरॅस्मस, पाकिस्तानच्या अयुब आणि नेदरलँडच्या आर्यन दत्तने आपल्या फलंदाजांना चांगलेच सतावले. भारतीय फलंदाजी एक युनिट म्हणून बहरलीच नाही.
टी-20 क्रिकेट हे इतके वेगवान असते की, द. आफ्रिकेने आपला सुपर-8 मध्ये मोठा पराभव केल्यावर त्यांच्यात अनेकांनी विश्वविजेता संघ बघितला होता; पण फिन ॲलनने तेरा षटकांत हे समीकरण बदलले. या एका उपांत्य सामन्याने न्यूझीलंडने संभाव्य अंतिम फेरीचे चित्र पालटवले असले, तरी त्यांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास हा अडखळतच होता. साखळी फेरीत द. आफ्रिकेविरुद्ध पराभव, सुपर-8 मध्ये इंगलंडविरुद्ध पराभव आणि नेट रनरेटवर उपांत्य फेरीत प्रवेश हे बघितले, तर भारताचा इथपर्यंतचा प्रवास हा जास्त आश्वासक वाटायला लागतो. ‘आयसीसी’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोण किती वेळा खेळले याची आकडेवारी बघितली, तर भारत सर्व फॉरमॅटमध्ये मिळून पंधराव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर न्यूझीलंडची ही आठवी खेप आहे; पण मर्यादित षटकांच्या स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाला अजून विजेतेपदाची चव चाखायची आहे.
रविवारी जेव्हा दोन्ही संघ मैदानात उतरतील तेव्हा अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव हा घटक महत्त्वाचा असेल; पण एक लाख वीस हजार प्रेक्षकांसमोर खेळायचे आव्हान न्यूझीलंडसमोर असेल. निव्वळ टी-20 विश्वचषकाची आकडेवारी बघितली, तर भारताला अजून न्यूझीलंडविरुद्ध विजयाची प्रतीक्षा आहे. 2007 ला जोहान्सबर्ग, 2016 ला नागपूर आणि 2021 दुबई या तिन्ही आधीच्या सामन्यांत न्यूझीलंडने भारताला हरवले आहे. हा झाला इतिहास; पण टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास कसा पुसला जातो, हे न्यूझीलंडनेच या स्पर्धेत उपांत्य फेरीत दाखवले. तेव्हा रविवारी दोन्ही संघांच्या मैदानावरच्या कामगिरीत मानसिक कणखरता हा महत्त्वाचा घटक असेल. आतापर्यंत कुणीही संघ घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकलेला नाही तेव्हा घरच्या प्रेक्षकांसमोर पाठिंबा तर असतोच;
पण दडपणही असते. दोन्ही संघांचे बलाबल, खेळपट्टी आणि काय रणनीती असेल, याचा आढावा आपल्याला शनिवारी अहमदाबादची परिस्थिती बघून घ्यायचा आहे; पण निव्वळ संघाचा विचार केला, तर भारतीय संघात अंतिम सामन्यासाठी काही बदल संभवत नाही. किंबहुना उपलब्ध पर्याय बघताना या क्षणी हा बदल न केलेलाच बरा. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गेल्याच वर्षी अंतिम सामन्यात भिडले होते; पण टी-20 सामन्यात कुठच्याच इतिहासाच्या संदर्भाचा फरक पडत नाही. जोगिंदर सिंग हा आपला विजयाचा शिल्पकार ठरू शकतो आणि एका झेलाने विश्वचषक विजेत्यांचे लिहिलेले नाव खोडून बदलायची वेळ येते. एक मात्र आहे, अंतिम सामन्यात द. आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया संघांपेक्षा सभ्य न्यूझीलंडचा संघ असल्याने सामन्याआधी शाब्दिक लढती न होता फक्त मैदानातच लढत असेल.