

T20 World Cup Final
अहमदाबाद : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामना रविवार, ८ मार्च रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू ग्लेन फिलिप्स याने दोन्ही संघांच्या ताकदीतील फरकावर भाष्य करतात भारताचा लोकसंख्येवर टिप्पणी करत आपल्या देशाशी तुलना केली आहे.
सराव सत्रापूर्वी बोलताना ग्लेन फिलिप्स म्हणाला की, फक्त ५० लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडने १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या क्रिकेटमधील महासत्तेला टक्कर देणे ही एक मोठी कामगिरी आहे. न्यूझीलंडकडे खेळाडू निवडण्यासाठी खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. न्यूझीलंडला आपल्याकडे असलेल्या मर्यादित खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करण्यावर आणि शिस्तबद्ध नियोजनावर भर द्यावा लागतो, असेही फिलिप्सने स्पष्ट केले.
"१४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारताकडे प्रतिभेची कमतरता नाही. ते एकाच वेळी समतुल्य ताकदीचे तीन वेगवेगळे संघ मैदानात उतरवू शकतात. याउलट, आमच्याकडे खेळाडू निवडण्यासाठी मर्यादित पर्याय आहेत. त्यामुळे आमचा 'हाय परफॉर्मन्स' कार्यक्रम अतिशय विशिष्ट आणि उपलब्ध लोकसंख्येला साजेसा असावा लागतो."
भारतातील क्रिकेट गुणवत्ता थक्क करणारी आहे. अशा परिस्थितीत इतक्या लहान लोकसंख्येचा देश असूनही आम्ही जागतिक स्तरावर इतर संघांशी करत असलेली स्पर्धा खरोखरच विलक्षण आहे," असल्याचेही फिलिप्सने नमूद केले.
जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या फिलिप्सने अंतिम सामन्यापूर्वी भारतीय लोकसंख्येवर भाष्य करत चेंडू भारताच्या कोर्टात टोलावला आहे. अब्जावधी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे असलेल्या भारतीय संघावर मानसिक दडपण टाकण्याचा हा एक प्रयत्न असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
आकडेवारीचा विचार केला तर न्यूझीलंडची एकूण लोकसंख्या सुमारे ५३.६ लाख आहे. विशेष म्हणजे, टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामना होणार्या अहमदाबाद शहराची लोकसंख्या सुमारे ९३ लाख आहे. म्हणजेच न्यूझीलंडची संपूर्ण लोकसंख्या या शहरापेक्षाही ४० लाखांनी कमी आहे.