T20 World Cup Final Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup Final: टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारत-न्यूझीलंड आमनेसामने; क्रिकेटमध्ये घडणार ऐतिहासिक विक्रम

कसोटी, वनडे आणि टी-20 आयसीसी फायनलमध्ये भिडणारे पहिलेच संघ; 8 मार्चला महामुकाबला

पुढारी वृत्तसेवा

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अंतिम सामन्यात भिडणारे भारत-न्यूझीलंड ठरणार पहिलेच प्रतिस्पर्धी

चॅम्पियन्स ट्रॉफी ते टी-20 वर्ल्डकप व्हाया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असा लक्षवेधी प्रवास

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीत रविवारी (दि. 8 मार्च) जेव्हा हे दोन दिग्गज संघ एकमेकांशी भिडतील, तेव्हा क्रिकेटच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची आणि विक्रमाची नोंद होईल. या सामन्यामुळे हे दोन्ही संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) ‌‘आयसीसी‌’च्या फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळणारे पहिले संघ ठरले आहेत. यापूर्वी ‌‘आयसीसी‌’च्या इतिहासात असा आगळा वेगळा विक्रम कधीही घडलेला नाही. जगातील हे दोन सर्वोत्तम संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा क्रिकेटचा थरार शिगेला पोहोचणार हे निश्चित आहे.

पहिल्या ‌‘अंतिम‌’ लढतीची सुरुवात सन 2000 मध्ये...

भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमधील ‌‘अंतिम‌’ लढतीची सुरुवात सन 2000 मध्ये सुरू झाली. तत्कालीन ‌‘आयसीसी‌’ नॉक आऊट (आजची चॅम्पियन्स ट्रॉफी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत किवींनी भारतीय वाघांची वाट रोखली होती. शेवटच्या दोन चेंडूंचा श्वास रोखणारा थरार आणि 4 विकेटस्‌‍ राखून न्यूझीलंडने मारलेली ती बाजी भारतीय चाहत्यांच्या आजही काळजात सलतेय. तिथूनच या दोन देशांमधील क्रिकेटच्या कोल्ड वॉरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

या लढतीत सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताने 264 धावा केल्या होत्या, ज्यात गांगुलीची शतकी खेळी (117) होती. मात्र, ख्रिस केर्न्सच्या नाबाद 102 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना जिंकला होता. ‌‘आयसीसी‌’ नॉकआऊट स्पर्धेतील ही पहिलीच मोठी लढत होती.

कसोटीच्या रणांगणावर किवींचे वर्चस्व

2021 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) स्पर्धेच्या अंतिम

फेरीत भारत आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. साऊथॅम्प्टन येथे झालेल्या या अंतिम सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडने भारतीय फलंदाजांना (विशेषतः दुसऱ्या

डावात 170 धावांत गुंडाळून) अडचणीत आणले. 139 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने विल्यमसन

आणि रॉस टेलर यांच्या नाबाद अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर सहज गाठले.

...आणि भारताचा पलटवार

भारताने दोन अंतिम फेरीतील आपल्या पराभवाच्या ठसठसणाऱ्या जखमांवर अखेर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत हिशोब चुकता केला. त्या महाअंतिम युद्धात भारतीय शिलेदारांच्या जिद्दीपुढे न्यूझीलंडच्या किल्ल्याचे बुरूज कोसळले आणि टीम इंडियाने दिमाखात अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

चेंडू आणि बॅटची धुमश्चक्री

टी-20 वर्ल्डकपच्या फायनलच्या निमित्ताने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय अशा तिन्ही फॉरमॅटच्या अंतिम सामन्यात परस्परांविरुद्ध खेळणारे भारत आणि न्यूझीलंड हे पहिलेच प्रतिस्पर्धी संघ ठरणार आहेत, असा पराक्रम यापूर्वी जगातील इतर कोणत्याही दोन संघांना करता आलेला नाही. आता या महामुकाबल्यात चेंडू आणि बॅटच्या या धुमश्चक्रीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. 8 मार्चच्या रात्री आपला सर्वोत्तम खेळ करेल, तोच विश्वविजेतेपदाचा चषक उंचावेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांवर दृष्टीक्षेप

एकूण खेळलेले सामने : 32

भारताचे विजय : 16

न्यूझीलंडचे विजय : 14

निकाल नाही : 2

(टीप : यामध्ये टाय झालेल्या आणि सुपर ओव्हरमध्ये भारताने जिंकलेल्या सामन्यांचाही समावेश आहे.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT