कोलंबो : श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात वन-डे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत राहिला. या सामन्यात श्रीलंकेने भारताला 231 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतालाही 47.5 षटकांत सर्वबाद 230 धावाच करता आल्याने सामना बरोबरीत सुटला.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने लंकेला 8 बाद 230 धावांवर रोखले. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि काही इतर खेळाडू वर्ल्डकप विजयानंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरले.
श्रीलंकेने दिलेल्या 231 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली दिली. त्यांच्यातील 75 धावांची भागीदारी दुनिथ वेल्लालागेने तोडली. त्याने शुभमन गिलला 16 धावांवर 13 व्या षटकात बाद केले. दरम्यान, रोहितने अर्धशतक पूर्ण केले; पण त्याला त्यानंतर लगेचच वेल्लालागेनेच 15 व्या षटकात पायचीत पकडले. त्यामुळे रोहितला 47 चेंडूंत 58 धावा करून माघारी परतावे लागले. पुढच्याच षटकात अकिला धनंजयाने वॉशिंग्टन सुंदरला 5 धावांवर पायचीत केले.
यानंतर वानिंदू हसरंगाने विराटला 24 धावांवर पायचीत करत माघारी धाडले, तर पुढच्याच षटकात असिथा फर्नांडोने श्रेयस अय्यरला 23 धावांवर त्रिफळाचीत केले. भारतीय संघ 25 षटकांच्या आतच 5 विकेटस् गमावल्याने अडचणीत सापडला होता; पण यावेळी के. एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी 57 धावांची भागीदारी केली आणि भारताच्या आशा उंचावल्या.
मात्र, 40 व्या षटकात के. एल. राहुलला वानिंदू हसरंगाने दुनिथ वेल्लालागेच्या हातून 31 धावांवर बाद केले आणि सामन्यात रोमांच आणला. त्यातच 41 व्या षटकात कर्णधार चरिथ असलंकाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या अक्षर पटेललाही 33 धावांवर बाद करत पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर हसरंगाने 45 व्या षटकात कुलदीप यादवलाही बाद केले; पण शिवम दुबे फलंदाजी करत असल्याने भारताच्या आशा कायम होत्या.
त्याने चौकार ठोकून बरोबरी साधून दिली. परंतु, विजयासाठी अवघ्या एका धावेची गरज असताना 48 व्या षटकात दुबेला असलंकाने 25 धावांवर बाद केले, त्याच्या पुढच्याच चेंडूवर अर्शदीप सिंगही पायचीत झाल्याने भारताचा डाव संपला आणि सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात सुपर ओव्हर नसल्याने निकालही बरोबरीचा लागला. श्रीलंकेकडून चरिथ असलंका आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या, तर दुनिथ वेल्लालागेने 2 विकेटस् घेतल्या आणि असिथा फर्नांडोने 1 विकेट घेतली.