

सांगली : सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फूट 6 इंचावरून शुक्रवारी दुपारी 39 फूट 9 इंच झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पाणीपातळी स्थिर होती. पाणी इशारा पातळीच्या आत आले आहे, मात्र शुक्रवारी कोयनेचा विसर्ग दहा हजार क्युसेकने वाढवून 52 हजार 100 क्युसेक केला आहे. धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शनिवारी दुपारपासून पाणी वाढेल. शनिवारी व रविवारी सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. सांगलीत रविवारी पाणी पातळी दोन ते तीन फुटाने वाढण्याची शक्यता आहेे. त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी कोयना धरणाचा विसर्ग 10 हजार क्युसेकने वाढवून तो 52 हजार क्युसेक केला आहे. भारतीय हवामान खात्याने सातारा जिल्ह्याकरिता शनिवारी व रविवारी पावसाचा रेड अलर्ट व सोमवारी आँरेज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी शनिवारी दुपारनंतर वाढण्यास सुरूवात होईल. रविवारी 2 ते 3 फूट पाणी वाढण्याची शक्यता सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी व्यक्त केली आहे.
सांगलीत गुरूवारी पहाटे चार वाजता पाणीपातळी 40 फूट 6 इंच होती. त्यानंतर दहा तास पाणीपातळी स्थिर होती. त्यानंतर पाणी अतिशय संथ गतीने उतरू लागले. गुरूवारी रात्री दोन वाजता पाणी 40 फुटावर आले. शुक्रवारी सकाळी 8 वाजता 39 फूट 11 इंच, दुपारी दोन वाजता 39 फूट 9 इंच झाले. रात्री साडेसात वाजताही पाणी 39 फूट 9 इंचावर स्थिर होते. सांगलीत इशारा पातळी 40 फुटाला, तर धोका पातळी 45 फुटाला आहे. पाणी इशारा पातळीच्या आत आल्याने सांगलीकरांना थोडा दिलासा मिळाला. मात्र शनिवारी दुपारपासून पाणी पुन्हा वाढण्यास सुरूवात होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे धास्ती कायम आहे. सांगलीत पूरक्षेत्रातील 2 हजार 166 व्यक्तींनी स्थलांतर केलेले आहे.
कोयना धरणामधून 52 हजार 100 क्युसेक, धोम धरणातून 7 हजार 856, कण्हेर धरणातून 4 हजार 844, धोम बलकवडी धरणातून 1 हजार 415, उरमोडी धरणातून 2 हजार 973, तारळी धरणातून 4 हजार 960 व वारणा धरणातून 11 हजार 532 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
शुक्रवारी सकाळी 8 वाजता मागील चोवीस तासात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात 96 मि.मी., नवजा 131 मि.मी., महाबळेश्वरला 135 मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान शिराळा तालुका वगळता सांगली जिल्ह्यात रिमझिम पाऊस होता. शिराळ्यात 31.2 मि.मी. पाऊस झाला. शुक्रवारी आठ त पाच या कालावधीत कोयनेला 36 मि.मी., नवजा 21 मि.मी., महाबळेश्वरला 35 मि.मी. पावसाची नोंद आहे. शुक्रवारी रात्री कोयना, नवजा, महाबळेश्वरला चांगल्या पावसाचा अंदाज होता. शनिवारी व रविवारी सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, तर सोमवारी ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे सांगलीत पुराची धास्ती कायम आहे.