

इचलकरंजी : येथील शहापूर स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकांनी पुन्हा अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
येथील पंचगंगा नदी तीरावर असलेल्या स्मशानभूमीत पुरामुळे पाणी आले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहर व परिसरातील मृतदेहांवर शहापूर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री शहापूर येथील जावईवाडीमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर शहापूर स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर नातेवाईक निघून गेले; परंतु सरणासाठी असणारी लाकडे कमी पडल्याने मृतदेह अर्धवट जळाला होता. पहाटेच्या सुमारास काही नागरिक स्मशानभूमीत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अर्धवट जळालेला मृतदेह भटक्या कुत्र्यांनी ओढत बाहेर काढल्याचे व त्याचे लचके तोडल्याचे निदर्शनास आले.
नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला असता भटकी कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात होती. महत्प्रयासाने नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. त्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. शहापुरातील स्मशानभूमीत कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक महापालिकेने तातडीने करावी, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरजही व्यक्त होत होती.