प्रातिनिधक छायाचित्र.  File Photo
स्पोर्ट्स

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात कोण जिंकणार? शोएब अख्तर म्हणतो, "भारत आम्हाला..."

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक!

पुढारी वृत्तसेवा

India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आज (दि. १४) आशिया चषकात आमनेसामने येणार आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठे वक्तव्य केले आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी एका टीव्ही शोमध्ये बोलताना अख्तरने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले.

"भारतीय खेळाडू आमच्यावर वर्चस्व गाजवतील"

शोएब अख्तर म्हणाला की, "रविवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ आमच्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवेल. ते आम्हाला वाईट रीतीने हरवतील. हे खूप सोपे आहे. आणखी स्पष्टपणे सांगायचे झाल्यास, अंतिम फेरीसाठी निवड मिळाल्यास भारतीय संघ पाकिस्तानऐवजी अफगाणिस्तानशी खेळायला प्राधान्य देईल."

"भारतीय संघाला जाणवेल विराटची अनुपस्थिती" – मिस्बाह

यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह-उल-हक यांनी वेगळी भूमिका मांडली. तो म्हणाला, "भारतीय संघात विराट कोहलीसारखा अनुभवी खेळाडू नाही, जो कठीण परिस्थितीत डाव सांभाळू शकेल. भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही तर पाकिस्तानकडे संधी आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या वरच्या फळीवर दबाव आणला, तर जिंकण्याची संधी आहे."

मिस्बाहच्या मताशी शोएब असहमत

मिस्बाहच्या मतावर बोलताना शोएब अख्तर म्हणाला, "मी या मताशी सहमत नाही. कारण भारताकडे रिंकू सिंग, संजू सॅमसन, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि जितेश शर्मा असे फलंदाज आहेत. अक्षर पटेलही चांगली फलंदाजी करू शकतो. एक काळ होता की दोन विकेट गमावल्यावर भारतीय संघ कोसळायचा, मात्र आता हा संघ बदलला आहे. हा विराट कोहलीच्या वेळेचा संघ नाही. त्यांना सहजासहजी बाद करणे सोपे नाही. अभिषेक शर्माही उत्कृष्ट फलंदाज आहे."

भारताची मधली फळी अत्यंत मजबूत

शोएब अख्तरने सांगितले की, "आज मैदानात उतरणारा भारताचा संघ हा आतापर्यंतची सर्वात मजबूत मधली फळी असणारा संघ आहे." भारताने गेल्या पाच सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. पाकिस्तानने अखेरचा विजय २०२२ च्या आशिया कप सुपर-४ मध्ये मिळवला होता.

प्रशिक्षक गंभीर यांनी टीमला दिला ‘हा’ संदेश

सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रेयान टेन डोएशे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हा एक खूप संवेदनशील मुद्दा आहे. खेळाडूंना देशातील लोकांच्या भावनांची जाणीव आहे. आम्ही संघाच्या बैठकीत यावर चर्चा केली आहे. खेळाडू येथे क्रिकेट खेळण्यासाठी आले आहेत आणि आम्ही सरकारचे निर्देश पाळत आहोत. खेळ आणि राजकारण वेगळे ठेवण्याचा आमचा विचार आहे. मी लोकांच्या भावना समजू शकतो, परंतु आम्ही बीसीसीआय आणि सरकारचे निर्देश पाळत आहोत. आम्हाला याची कल्पना होती आणि हे निराशाजनक आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा संदेश आहे की, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा संदेश आहे की, फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा."

सामन्याबाबत गंभीर यांनी पूर्वी घेतली होती कठोर भूमिका

विशेष म्हणजे, याआधी गौतम गंभीर यांनी स्वतःच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर खूप कठोर भूमिका घेतली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, "माझे वैयक्तिक उत्तर 'नाही' असे आहे. जोपर्यंत सीमापार दहशतवाद थांबत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काहीही होऊ नये. शेवटी, त्यांच्यासोबत खेळायचे की नाही, हा सरकारचा निर्णय आहे. कोणताही क्रिकेट सामना, बॉलिवूड चित्रपट किंवा इतर कोणतीही गोष्ट भारतीय सैनिक आणि नागरिकांच्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाची नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT