

दुबई : आशिया कपमधील सर्वात मोठ्या सामन्यासाठी, म्हणजेच भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे, सिंगल तिकीट फॉरमॅट सुरू झाल्यानंतरही अपेक्षित प्रमाणात विकली जात नाहीत. आगामी 14 सप्टेंबर रोजी हा हायव्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. मात्र, सामन्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असूनही, वरच्या आणि टॉप-टीअर स्टँडची तिकिटे अजूनही उपलब्ध आहेत.
यापूर्वी, आयोजक भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे पॅकेज म्हणून विकत होते, ज्यात चाहत्यांना एकूण सात सामन्यांची तिकिटे एकत्र खरेदी करावी लागत होती. परंतु, तिकिटांची कमी विक्री पाहून आयोजकांनी सिंगल तिकीट फॉरमॅट सुरू केला. असे असूनही, तिकीट विक्रीत फारशी वाढ झालेली नाही. या मंद विक्रीबद्दल आश्चर्य व्यक्त करताना, एमिरेटस् क्रिकेटच्या एका अधिकार्याने ‘एएनआय’ला सांगितले की, ‘2022 च्या टी-20 वर्ल्डकपमधील या सामन्याची तिकिटे अवघ्या 4 मिनिटांत विकली गेली होती. परंतु, यावेळी उत्साह खूपच कमी आहे. कदाचित, याचे कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अनुपस्थिती असेल.’
या परिस्थितीमागे अनेक प्रमुख कारणे असल्याचा दावा विविध अहवालांतून केला जात आहे.
स्टार खेळाडूंची अनुपस्थिती
गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. या दोन स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांचा उत्साह कमी झाल्याचे मानले जात आहे.
राजकीय तणाव आणि बहिष्कार मोहीम
एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणाव वाढला आहे. यामुळे अनेक भारतीय चाहते सोशल मीडियावर बहिष्कार मोहिमेची मागणी करत असून, भारताने स्पर्धेतून माघार घ्यावी, असे म्हणत आहेत.
तिकिटांची वाढलेली किंमत
तिकीट पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांची किंमत खूप जास्त आहे. दोन जागांसाठी रॉयल बॉक्सची किंमत 2.30 लाख, तर सर्वात स्वस्त जनरल ईस्टची तिकिटेही सुमारे 10 हजार रुपयांना उपलब्ध आहेत, ज्यामुळे सामान्य चाहत्यांना तिकिटे खरेदी करणे महाग होत आहे.
पाकिस्तान संघातही स्टार पॉवरचा अभाव
काही अहवालांनुसार, पाकिस्तान संघातही बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसारख्या मोठ्या खेळाडूंना स्थान देण्यात आलेले नाही, ज्यामुळे दोन्ही संघांकडून स्टार आकर्षण कमी झाले आहे.
...तर तीन वेळा आमने-सामने
गट साखळीतील सामन्याव्यतिरिक्त, भारत आणि पाकिस्तान हे संघ जर सुपर-4 टप्प्यात पोहोचले, तर 21 सप्टेंबर रोजी त्यांच्यात पुन्हा एकदा सामना होण्याची शक्यता आहे. तसेच, जर दोन्ही संघ सुपर-4 मध्ये अव्वल राहिले, तर 28 सप्टेंबर रोजी होणार्या अंतिम सामन्यात तिसर्यांदा ते एकमेकांसमोर येऊ शकतात.