India vs Pakistan | पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच भारत-पाकिस्तान आमनेसामने

सामन्यावर बहिष्काराचे सावट असल्याने निरुत्साह; लढत होणार, पण ग्लॅमर हरवला
India pakistan clash asia cup after pahalgam attack boycott shadow
India vs Pakistan | पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच भारत-पाकिस्तान आमनेसामनेPudhari File Photo
Published on
Updated on

दुबई; वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर अवघ्या देशभरातून बहिष्काराचे सावट असताना भारत-पाकिस्तान हे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आज रविवार, दि. 14 आशिया चषकात आमनेसामने भिडत आहेत. मात्र, यानंतरही या लढतीला नेहमीसारखे ग्लॅमर नाही, हे एव्हाना सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील सीमावाद आणि तणाव वाढलेला असताना, भारत-पाकिस्तान सामन्याभोवती असणारा नेहमीचा उत्साह आणि जल्लोष यावेळी गायब झाला असल्याचेही दिसून आले आहे. तूर्तास, हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाणार आहे.

एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांचे पारडे मैलांच्या अंतराने जड असेल. येत्या चार महिन्यांत भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला विशेष महत्त्व आहे. असे असले तरी, अनेक वर्षांत प्रथमच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना, तोही रविवारी आयोजित असूनही, नेहमीच्या ग्लॅमरपासून कित्येक कोस दूर आहे. सीमेपलीकडून होणार्‍या घडामोडींचे सावट या सामन्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

भारतीय संघ अधिक सरस

शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा यांसारखे स्फोटक फलंदाज, जसप्रीत बुमराहसारखा भेदक गोलंदाज आणि कुलदीप यादव व वरुण चक्रवर्तीसारखे फिरकीचे जादूगार भारतीय संघात आहेत. कागदावर पाहिल्यास, भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूपच धोकादायक दिसतो. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ नवा कर्णधार सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली संघबांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत सरकारने द्विपक्षीय मालिकांना परवानगी नाकारली असली तरी, बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास संघास परवानगी दिली आहे.

फिरकी गोलंदाजांचे द्वंद्व

साधारणपणे भारत-पाकिस्तान सामना म्हणजे भारतीय फलंदाज विरुद्ध पाकिस्तानी वेगवान गोलंदाज असे समीकरण असते. पण यावेळी, जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी वगळता दोन्ही संघांमध्ये स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांची कमतरता असल्याने, फिरकीपटूंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. खेळपट्टी फिरकीला फारशी साथ देत नसली तरी, दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक उजव्या हाताचा आणि एक डाव्या हाताचा मनगटी फिरकी गोलंदाज येथे निर्णायक योगदान देणार का, याची उत्सुकता असेल.

भारताची मजबूत फलंदाजी

गोलंदाजीपेक्षाही भारताची फलंदाजी पाकिस्तानसाठी अधिक चिंतेचा विषय आहे. गिल, अभिषेक, संजू सॅमसन, सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांसारखे फलंदाज कोणत्याही गोलंदाजीची धुलाई करण्याची क्षमता राखून आहेत. हे खेळाडू कोणत्याही क्षणी पाकिस्तानला निष्प्रभ ठरवू शकतात. अष्टपैलू खेळाडूंमध्येही फहीम अश्रफ सामना जिंकून देण्याच्या क्षमतेमध्ये हार्दिक पंड्याच्या जवळपासही नाही. भारतासाठी आदर्श फलंदाजी क्रम निश्चित करणे महत्त्वाचे ठरेल. संजू सॅमसनचे स्थान आणि मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंवर आक्रमण करण्याची जबाबदारी असलेला शिवम दुबे यांची भूमिका निर्णायक असेल.

‘ऑपरेशन बॉयकॉट’चा ब्रॉडकास्टर्सनाही फटका?

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची लोकप्रियता विविध फॉरमॅट आणि स्पर्धांमध्ये खूप जास्त असली तरी, 2025 च्या आशिया चषकातील रविवारी होणार्‍या सामन्यासाठी जाहिरात दरांमध्ये 15 ते 20 टक्क्यांची घट झाली आहे. या घटीमागे अनेक कारणे असू शकतात, यात रिअल मनी गेमिंग क्षेत्रावरील अचानक बंदी हे एक प्रमुख कारण असल्याचे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी दूरदर्शनवरील 10 सेकंदांच्या जाहिरातीचा सरासरी दर सुमारे 10 ते 15 लाख रुपये होता. या वर्षीच्या स्पर्धेतील या सामन्यासाठीचा दर अद्याप जाहीर झालेला नाही. आयसीसी स्पर्धांसाठी दूरदर्शनवरील प्रति 10 सेकंद जाहिरातीचा सरासरी दर 20 लाख रुपयांपर्यंत जातो, असे जाणकारांनी सांगितले.

मध्यफळीसह फिरकी त्रिकुटावर पाकिस्तानची भिस्त

टी-20 फॉरमॅटचे अनिश्चित स्वरूप पाहता, अनपेक्षित निकालाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सध्याच्या भारतीय संघाविरुद्ध तसे होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पाकिस्तानच्या संघाने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सलामीवीर सॅम अयुब, मधल्या फळीतील हसन नवाझ आणि फिरकी त्रिकूट अबरार अहमद, सुफियान मुकीम व मोहम्मद नवाझ हे नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यास उत्सुक असतील.

शाहीनच्या भेदकतेवरच पाकचे यशापयश ठरणार?

पाकिस्तानच्या गोलंदाजीमध्ये भारताला जर कोणी धोकादायक ठरू शकत असेल, तर तो म्हणजे शाहीन आफ्रिदी. यापूर्वी, याच मैदानावर त्याने के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद करून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. मात्र, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो पूर्वीसारखा प्रभावी राहिलेला नाही. त्यामुळे, त्याच्या फॉर्मवरच पाकिस्तानचे यशापयश ठरू शकेल, असे प्राथमिक चित्र आहे.

नेहमीचा ग्लॅमर नाही, तरीही मैदानावरील लढत प्रतिष्ठेची!

आजच्या लढतीवर बहिष्काराचे सावट असल्याने मैदानावरील लढत प्रतिष्ठेची ठरणार का, याबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एरव्ही, भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’ म्हणून ओळखली जाते. मात्र, तो नेहमीचा ग्लॅमर या लढतीला लाभलेला नाही, हे देखील सुस्पष्ट आहे.

हजारो तिकिटे अजूनही विकलीच गेलेली नाहीत!

शुक्रवारी झालेल्या भारताच्या सराव सत्रावेळी अगदी तुरळक चाहते उपस्थित होते. यामुळे सामन्याभोवतीचे उत्साही वातावरण पूर्णपणे हरवले असल्याचे चित्र होते. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांकडून सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत आहे. शिवाय, आयोजकांनी प्रेक्षकांवर लादलेल्या तिकीट पॅकेज सिस्टीमचाही या लढतीला फटका बसतो आहे. याचमुळे या सामन्याची हजारो तिकिटे सामन्याच्या पूर्वसंध्येपर्यंत विकलीच गेली नव्हती, असे चित्र होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news