स्पोर्ट्स

IND vs WI Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, टीममध्ये 3 मोठे बदल

मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होणार

रणजित गायकवाड

ind vs wi test series west indies announced squad roston chase captain

बार्बाडोस : वेस्ट इंडिज क्रिकेट संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होईल. दरम्यान, या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेसाठी वेस्ट इंडिजने वेळेआधीच आपला संघ जाहीर केला आहे. संघाचे नेतृत्व रोस्टन चेसकडे देण्यात आले आहे. या संघात काही नवीन आणि युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेषतः भारताच्या संथ खेळपट्ट्यांवर कोण चांगली कामगिरी करू शकतो, याचा विचार करून संघ निवडण्यात आला आहे.

अहमदाबाद आणि दिल्ली येथे सामने

उभय संघांमधील पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर, १० ऑक्टोबरपासून दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होईल. वेस्ट इंडिजने या मालिकेसाठी १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे. २०१२ नंतर प्रथमच वेस्ट इंडिजचा संघ कसोटी मालिकेसाठी भारतात येत आहे.

विंडिजने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळली होती, ज्यात त्यांना तीनही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर, भारतीय दौऱ्यासाठी संघात तीन बदल करण्यात आले आहेत. विंडिजचे माजी डावखुरे फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल आणि एलिक अथानाजे यांच्याव्यतिरिक्त, फिरकीपटू खैरी पियरे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या खेळपट्ट्यांचा विचार करून संघाची निवड

संघाच्या घोषणेवेळी वेस्ट इंडिजचे क्रिकेट संचालक माइल्स बास्कोम्ब यांनी सांगितले की, ‘भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीसोबतच, भारताच्या संथ खेळपट्ट्यांवर कोण चांगले प्रदर्शन करू शकतो याचाही विचार करण्यात आला आहे.’ ते म्हणाले की, ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या चक्रातील ही वेस्ट इंडिजची दुसरी मालिका असल्यामुळे, भारताला त्यांच्याच भूमीत आव्हान देऊ शकेल असा मजबूत संघ निवडण्यात आला आहे.’ वेस्ट इंडिजचा संघ २२ सप्टेंबर रोजी आपल्या देशातून निघून २४ सप्टेंबरला थेट अहमदाबादमध्ये दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वेस्ट इंडिजचा संघ :

रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वारिकन (उप-कर्णधार), केवलन अँडरसन, एलिक अथानाजे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्स, शाई होप, टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खैरी पियरे, जेडन सील्स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT