स्पोर्ट्स

IND vs ENG Test : एजबॅस्टनच्या तख्तावर नवा वारसदार? विराट कोहलीच्या साम्राज्याला ऋषभ पंतचे आव्हान

एजबॅस्टनच्या मैदानावर भारतीय फलंदाज म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंत हा विक्रम मोडू शकतो.

रणजित गायकवाड

ind vs eng 2nd test rishabh pant can break virat kohli record

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी या महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यासाठी आपली तयारी सुरू केली आहे. लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 5 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे, आता भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.

या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला विराट कोहलीचा एक विशेष विक्रम मोडण्याची संधी आहे. एजबॅस्टनवर भारतीय खेळाडू म्हणून कसोटी प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे आणि तो मोडण्याची संधी पंतकडे असेल.

ऋषभ पंत विराट कोहलीला मागे टाकणार?

विराट कोहली आपल्या कसोटी कारकिर्दीत एजबॅस्टनच्या मैदानावर केवळ दोन सामने खेळू शकला आहे. त्या दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये विराटने 57.75 च्या सरासरीने 231 धावा केल्या आहेत. या मैदानावर विराटची सर्वोच्च धावसंख्या 149 आहे, जी त्याने 2018 मध्ये नोंदवली होती. दुसरीकडे, ऋषभ पंतने आतापर्यंत या मैदानावर फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. त्या एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये पंतने 101.50 च्या उत्कृष्ट सरासरीने 203 धावा केल्या आहेत.

या मैदानावर पंतने एक शतकही झळकावले असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 146 आहे. या मैदानावर भारतीय फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पंत विराटपेक्षा केवळ 28 धावांनी मागे आहे. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यात तो विराट कोहलीचा हा विक्रम सहज मोडू शकतो.

लीड्स कसोटीत ऋषभ पंतची शानदार कामगिरी

इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने चमकदार कामगिरी केली होती. त्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याच्या बॅटमधून शतके पाहायला मिळाली. पहिल्या डावात त्याने 134 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात तो 118 धावा करून बाद झाला होता.

भारतीय संघाला एजबॅस्टन कसोटी जिंकायची असेल, तर पंतला तेथेही अशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. आता मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये तो हा फॉर्म कायम राखण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एकाच सामन्यात इतिहास रचण्याची संधी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) इतिहासात ऋषभ पंतने 35 सामन्यांच्या 62 डावांमध्ये 43.17 च्या सरासरीने 2504 धावा केल्या आहेत. आगामी सामन्यात जर तो 213 धावा करण्यात यशस्वी झाला, तर तो रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मागे टाकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे 2716 आणि 2617 धावा केल्या आहेत.

'हिटमॅन'चा विक्रम धोक्यात

पंतने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 82 षटकार लगावले आहेत. जर त्याने आणखी सात षटकार मारले, तर तो भारतासाठी या प्रकारात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माला (88 षटकार) मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. या यादीत स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (91 षटकार) पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.

इंग्लंडच्या भूमीवर पंतची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी राहिली आहे. त्याने 10 कसोटी सामन्यांच्या 19 डावांमध्ये 42.52 च्या सरासरीने 808 धावा केल्या आहेत. या सामन्यात त्याला इंग्लंडमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण करण्याची संधी देखील असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT