icc t20 rankings tilak varma entry in top 5 suryakumar yadav big fall
दुबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचा थरार मैदानात सुरू असतानाच, आयसीसीच्या रँकिंगमध्येही मोठी 'उलथापालथ' पाहायला मिळत आहे. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा याने आपल्या बॅटच्या जोरावर रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे, तर दुसरीकडे टीम इंडियाचा 'मिस्टर 360' म्हणजेच सूर्यकुमार यादव याच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने आयसीसी रँकिंगमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. ९०९ रेटिंग पॉइंट्ससह तो पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याच्या खालोखाल इंग्लंडचा फिल साल्ट (८४९ रेटिंग) आणि श्रीलंकेचा पथुम निसंका (७७९ रेटिंग) यांचा क्रमांक लागतो.
या ताज्या क्रमवारीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे तिलक वर्माने. तिलकने थेट दोन स्थानांची झेप घेत टॉप ५ मध्ये एन्ट्री घेतली आहे. तो आता जागतिक क्रमवारीत चौथे स्थानी पोहचला आहे. ७७४ रेटिंगसह त्याने इंग्लंडच्या जोस बटलरला मागे टाकले आहे. तिलकची ही घोडदौड भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक मानली जात आहे.
भारतीय चाहत्यांसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवची घसरण. एकेकाळी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असणारा सूर्या आता थेट १० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सध्या त्याचे रेटिंग ६६९ असून, तो टॉप-१० च्या सीमेवर उभा आहे. जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांत त्याने मोठी खेळी केली नाही, तर तो टॉप-१० मधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे.
अभिषेक शर्मा (भारत) : ९०९ रेटिंग पॉइंट्स
फिल साल्ट (इंग्लंड) : ८४९ रेटिंग पॉइंट्स
पथुम निसंका (श्रीलंका) : ७७९ रेटिंग पॉइंट्स
तिलक वर्मा (भारत) : ७७४ रेटिंग पॉइंट्स
जोस बटलर (इंग्लंड) : ७७० रेटिंग पॉइंट्स
साहिबजादा फरहान (पाकिस्तान) : ७५२ रेटिंग पॉइंट्स
यशस्वी जयस्वाल (भारत) : ७०२ रेटिंग पॉइंट्स
मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया) : ६८४ रेटिंग पॉइंट्स
टिम सिफर्ट (न्यूझीलंड) : ६८३ रेटिंग पॉइंट्स
सूर्यकुमार यादव (भारत) : ६६९ रेटिंग पॉइंट्स
जोस बटलर आणि साहिबजादा फरहान यांना प्रत्येकी एक स्थानाचा तोटा झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श ८ व्या स्थानावर पोहोचला आहे, आणि न्यूझीलंडच्या टिम सिफर्टने दोन स्थानांची प्रगती करत ९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे दोन सामने सूर्यासाठी 'करो वा मरो' असे असणार आहेत. त्याला आपले स्थान टिकवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतावे लागेल.