

Yashasvi Jaiswal hospitalised
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याची प्रकृती बिघडली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरायटिस झाल्याची पुष्टी केली. त्याच्यावर उपचार करण्यात आले. अल्ट्रासाऊंड व सीटी स्कॅन केल्यानंतर त्याला औषधे सुरू ठेवण्याचा आणि पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
द इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीगमध्ये मंगळवारी मुंबईचा राजस्थानविरुद्ध सामना झाला. मुंबईकडून खेळताना यशस्वीने १६ चेंडूत १५ धावा केल्या. मुंबईतने राजस्थानला २१७ धावांचे लक्ष्य देत हा सामना तीन गडी राखून जिंकला. मात्र या सामन्यावेळीच जैस्वालच्या पोटात दुखू लागले. सामन्यानंतर त्रास वाढल्याने त्याला ततकाळ पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला तीव्र अतिसार (जुलाब), झाल्याची पुष्टी केली.
जैस्वालचे अल्ट्रासाऊंड व सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्याला औषधे सुरू ठेवण्याचा आणि पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयने अद्याप त्याच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही, परंतु येत्या काही दिवसांत याबाबत अधिक स्पष्टता अपेक्षित आहे.
भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळणार जैस्वालची प्रकृती बिघडणे टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. जैस्वाल गेल्या काही आठवड्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने तीन सामन्यांत ४८.३३ च्या सरासरीने आणि १६८.६ च्या स्ट्राइक रेटने १४५ धावा केल्या. या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही त्याने चांगली कामगिरी केली, तीन सामन्यांत ७८ च्या उल्लेखनीय सरासरीने १५६ धावा केल्या, ज्यात त्याचे पहिले एकदिवसीय शतकही समाविष्ट आहे जैस्वाल सध्या कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा नसल्यामुळे आणि तो भारताच्या टी-२० संघातही नसल्यामुळे जानेवारीच्या मध्यात सुरू होणाऱ्या भारताच्या पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यांपूर्वी जयस्वालला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे.