Hardik Pandya KKR: आयपीएल 2027 पूर्वी भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. हार्दिक मुंबई इंडियन्सचा निरोप घेऊ शकतो, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. सुरुवातीला त्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा चेन्नई सुपर किंग्जसोबत होत होती. मात्र आता या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आघाडीवर आल्याचे वृत्त समोर आले आहे.
काही माध्यमांतील वृत्तांनुसार, कोलकाता नाईट रायडर्सने हार्दिक पांड्यासाठी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत. केवळ संघात स्थानच नाही, तर कर्णधारपदाची जबाबदारीही हार्दिककडे सोपवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन हंगामांत KKR ची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे संघाला अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे मानले जात आहे. हार्दिक हा फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही बाबतीत संघासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.
हार्दिकला संघात आणण्यासाठी KKR नेमका कोणता मार्ग स्वीकारणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबई इंडियन्ससोबत खेळाडूंची अदलाबदल (Trade) होणार की थेट आर्थिक करार होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही अहवालांनुसार, KKR कडे ट्रेडसाठी मर्यादित पर्याय असल्याने आर्थिक व्यवहाराची शक्यता नाकारता येत नाही.
हार्दिक पांड्याच्या संभाव्य कराराबाबतही विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्यावर यापूर्वी मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती. त्यामुळे हार्दिकला जवळपास 25 कोटी रुपयांच्या करारासह संघात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. KKR आणि मुंबई इंडियन्स यांच्यात असा कोणताही अधिकृत करार झालेला नसून, ही केवळ माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा आहे.
हार्दिक पांड्या चेन्नई सुपर किंग्जसोबत जाणार याची जोरदार चर्चा होती. मुंबई इंडियन्स आणि CSK यांच्यात ट्रेड होऊ शकतो, अशा बातम्या समोर आल्या होत्या. या चर्चांमध्ये काही खेळाडूंच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला होता. मात्र दोन्ही फ्रँचायझींनी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
हार्दिक पांड्या हा आयपीएलमधील सर्वात प्रभावी अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जातो. त्याने आतापर्यंत 162 आयपीएल सामने खेळले असून 2,955 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 82 विकेट्स आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांत त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
सध्या हार्दिक पांड्या KKR मध्ये जाणार की मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आयपीएल 2027 पूर्वीच्या ट्रेड विंडोमध्ये या घडामोडींवर सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.