gambhir support to shubman gill for next india s test team captain
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमान इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड 23 मे (शुक्रवार) रोजी होण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन कसोटी कर्णधाराची घोषणाही यावेळी केली जाईल.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, 'भारतीय क्रिकेटचा राजकुमार' शुभमन गिल कसोटी कर्णधार बनणे निश्चित दिसते. पीटीआयच्या वृत्तानुसार, काही माजी भारतीय क्रिकेटपटू गिलला कर्णधार पद बनवू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. पण संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि शुभमन यांची नुकतीच दिल्लीत भेट झाली, त्यानंतर या धुरंधर फलंदाजाची कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती अंतिम करण्यात आल्याचे समजते आहे. निवड समितीचे सदस्य किंवा गंभीर त्यांच्या भूमिकेपासून मागे हटण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी गिलला कर्णधारपद देण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर गौतम गंभीर खूप शक्तिशाली झाले आहेत. त्यामुळे संघ निवडीत कर्णधारापेक्षा प्रशिक्षकाचा जास्त सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे.
गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीनंतर अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहसह उर्वरित दावेदारांच्या (केएल राहुल, ऋषभ पंत) शक्यता आता संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक खेळाडू झाले आहेत जे पूर्णवेळ कर्णधार बनण्यास सक्षम होते, पण ते होऊ शकले नाहीत.
अनेक भारतीय दिग्गजांनी म्हटले आहे की शुभमन गिल हा एक चांगला उदयोन्मुख खेळाडू आहे, परंतु सध्या फक्त जसप्रीत बुमराहच नवीन कसोटी कर्णधार म्हणून योग्य असेल. नवीन कर्णधार होण्याच्या शर्यतीतही तो आघाडीवर होता पण मागे पडला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेलेला बुमराह बराच काळ परतू शकला नाही. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर राहिला, त्यानंतर तो आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्येही खेळला नाही.
दुखापतीमुळे बुमराह बराच काळ क्रिकेटपासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापूर्वीही तो दुखापतीमुळे 11 महिने मैदानापासून दूर होता. त्यामुळे वर्कलोडची समस्या पाहता बुमराहला कसोटी संघाच्या कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी द्यावी का? असा निवडकर्त्यांसमोर पेच आहे. परिणामी या शर्यतीत शुभमन गिलचे नाव पुढे आले. तो सातत्यपूर्ण या फॉरमॅटमध्ये खेळत आहे.
गिलने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 32 कसोटी सामन्यांच्या 59 डावांमध्ये 35.05 च्या सरासरीने 1893 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 शतके आणि 7 अर्धशतके झळकली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 128 आहे.
पहिली कसोटी : 20 ते 24 जून, हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी : 2 ते 6 जुलै, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी : 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी : 23 ते 27 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी : 31 ते 4 जुलै ऑगस्ट, द ओव्हल, लंडन