Gautam Gambhir on Test Cricket : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यात टीम इंडियाचा नामुष्कीजनक पराभव झाला. तब्बल ४९८ धावांनी हा सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने मालिका २- ० अशी जिंकली. आता या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज (दि. २६) गंभीरला पत्रकार परिषदेत काही कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागले. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहणार का, या प्रश्नावरही त्याने आपली भूमिका स्पष्ट केली.
भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला ०-२ अशा पराभवासाठी जबाबदार धरले पाहिजे, परंतु दोष त्याच्यापासून सुरू होतो. दोष प्रत्येकावर असतो, तो माझ्यापासून सुरू होतो. खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे आहे. जेव्हा संघ ९५ धावांवर एक विकेट गमावत त्यानंतर १२२ धावांवर ७ गडी बाद होतात हे स्वीकारार्ह नाही. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही विशिष्ट शॉटला दोष देत नाही. दोष प्रत्येकावर आहे. मी कधीही व्यक्तींना दोष दिला नाही आणि पुढेही देणार नाही," असेही यावेळी गंभीरने स्पष्ट केले.
कसोटी क्रिकेटमधील कोणत्या प्रकारचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतात यावर बोलताना त्याने सांगितले की, "कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंची गरज नाही. आपल्याला मर्यादित कौशल्यांसह झुंजार वृत्तीच्या खेळाडूंची आवश्यकता आहे. अशी वृत्ती चांगले कसोटी क्रिकेटपटू बनवतात."
पत्रकार परिषदेत प्रशिक्षक पदावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीर म्हणाला की, मी प्रशिक्षकपदावर राहण्यास पात्र आहे की नाही, याबाबत निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) घेईल. मी यापूर्वीही म्हटलं आहे की, मी महत्वाचे नाही, भारतीय क्रिकेट महत्वाचा आहे.
मी तोच प्रशिक्षक आहे ज्याने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत निकाल मिळवून दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला. हा संघ शिकत आहे. जर तुम्ही खरोखरच कसोटी क्रिकेटबाबत गांर्भीयाने विचार करायचा असेल तर कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणे सुरू करा. भारतात कसोटीमधील दर्जा उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. तुम्ही फक्त खेळाडूंना किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला दोष देऊ शकत नाही," असेहीत्याने स्पष्ट केले.
गंभीरच्या नेतृत्वाखाली, भारताने १८ पैकी १० कसोटी सामने गमावले आहेत. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या व्हाईटवॉशनंतर, पुढील घरच्या सामन्यापूर्वी संघात संपूर्ण फेरबदल करण्यात आला. संघात नवीन चेहरे असूनही, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा निकाल न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसारखाच लागला. गंभीरला अलीकडेच संघात वारंवार बदल आणि पारंपारिक स्वरूपातील तज्ञांपेक्षा अष्टपैलू खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या त्याच्या निवडीवरही आता टीका होवू लागली आहे.