adam gilchrist statement on ms dhoni retirement from ipl
चेन्नई : ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्टला वाटते की महेंद्रसिंग धोनीने आता त्याच्या आयपीएल कारकिर्दीला ब्रेक द्यावा. गिलख्रिस्टने धोनीला आयपीएल 2025च्या हंगामानंतर निवृत्तीचा सल्ला दिला आहे. 43 वर्षीय धोनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळतो आणि ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत तो सध्या संघाचे नेतृत्व करत आहे. दुखापतीमुळे गायकवाडला हंगामाच्या मध्यातच बाहेर जावे लागले.
सीएसकेसाठी यंदाचा हंगाम चांगला गेलेला नाही. हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. दरम्यान, बुधवारी सीएसके आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी गिलख्रिस्टने धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत त्याचे परखड मत मांडले. ऑस्ट्रेलियाचा हा माजी खेळाडू म्हणाला की, धोनी हा आयपीएल आणि जागतिक क्रिकेटचा आयकॉन आहे. त्याला सिद्ध करण्यासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही.’
गिलख्रिस्ट पुढे म्हणाला, ‘धोनीला खेळात कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. काय करायचे ते त्याला चांगलेच माहिती आहे. परंतु भविष्यासाठी त्याला कदाचित पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याची गरज नाही. मला धोनी आवडतो आणि तो चॅम्पियन-आयकॉन आहे.’
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला आहे. तो आयपीएलच्या 18व्या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळत आहे. दरम्यान, तो आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याची सतत चर्चा होत असते. माहीने अलीकडेच यावर आपले मौन सोडले. धोनीने चाहत्यांना आश्वासन दिले की तो या हंगामाच्या शेवटी निवृत्ती घेणार नाही. धोनीने म्हटले होते की, मी 44 व्या वर्षीही खेळू शकतो का हे पाहण्यासाठी मला माझ्या शरीराला आठ महिन्यांचा कालावधी द्यावा लागेल.’