

virender sehwag criticizes csk
नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज 9 सामन्यांत सात पराभवामुळे गुणतालिकेत तळावर आहे आणि उर्वरित पाच सामने जिंकूनही प्ले ऑफमध्ये ते प्रवेश करतील, याची खात्री नाही. माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तो म्हणाला, चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंना घरी जाण्याची घाई झाली आहे.
क्रिकबजच्या कार्यक्रमात सेहवाग म्हणाला, ‘सीएसकेच्या संघातील किमान एकाने तरी जबाबदारी घ्यायला हवी. जडेजाचा स्ट्राईक रेट किती टुकार आहे ते पाहा. किमान त्याने 15 किंवा 18 व्या षटकापर्यंत मैदानावर उभे राहण्याचा प्रयत्न तरी करायला हवा होता,’ असे वीरू म्हणाला. जडेजाने 9 सामन्यांत 166 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 125.76 इतका आहे. आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीतील त्याचा स्ट्राईक रेट 129.56 इतका आहे, त्यापेक्षा खराब कामगिरी त्याने यंदा केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल केलेले पाहायला मिळाले. याबद्दलही वीरूने संताप व्यक्त केला. रचिन रवींद्रला शुक्रवारी प्लेईंग इलेव्हनमधून वगळले गेले. आयुष म्हात्रेला सलामीला संधी दिल्यामुळे चेन्नईचा तिसर्या क्रमांकाचा प्रश्न तसाच आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सॅम कुरेन तिसर्या क्रमांकावर आला. ‘सॅम कुरेन तिसर्या क्रमांकावर काय करतोय, हेच मला समजले नाही. त्याने वरच्या क्रमांकावर खेळावे, हे नक्की. यापूर्वी आयपीएलमध्ये तो चौथ्या क्रमांकावर खेळला होता आणि त्याने ती भूमिका चोख बजावली होती.
चेन्नईच्या लाईनअपचा विचार केल्यास डेवॉल्ड ब्रेव्हिस तिसर्या क्रमांकावर असायला हवा होता,’ असे वीरू म्हणाला. ‘त्यानंतर दुबे, जडेजा, कुरेन व दीपक हुडा असा क्रम असायला हवा. ऋतुराज गायकवाडची उणीव जाणवतेय,’ असेही वीरू म्हणाला.