भारताच्या यजमानपदाखाली 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघात आशियातील परिस्थिती लक्षात घेता, चार विशेषज्ञ फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंड संघाचे नेतृत्व नॅट सायव्हर-ब्रंटकडे सोपवण्यात आले आहे. संघात हेदर नाइट, डॅनी व्याट-हॉज आणि सारा ग्लेन यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हेदर नाइट हिला याच वर्षी मे महिन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. पण, तिने वेळेत तंदुरुस्त होऊन विश्वचषक संघात पुनरागमन केले आहे.
कर्णधार म्हणून नॅट सायव्हर-ब्रंट आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून शार्लट एडवर्ड्स यांच्यासाठी ही पहिलीच आयसीसी स्पर्धा असेल. केट क्रॉस, माइया बाउचर आणि एलिस-डेव्हिडसन रिचर्ड्स यांना मात्र संघात स्थान मिळवता आलेले नाही. दुसरीकडे, डॅनी व्याट-हॉज हिला या वर्षी भारताविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते, परंतु आता तिने विश्वचषक संघात यशस्वी पुनरागमन केले आहे.
विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेच्या मैदानांवर होणार असल्याने, तेथील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना पोषक ठरण्याची दाट शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन इंग्लंडने आपल्या संघात सारा ग्लेन आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यासह एकूण चार फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. चार्ली डीन आणि लिंडसे स्मिथ या अन्य दोन फिरकी गोलंदाज आहेत.
विश्वचषकाचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र, तरीही बेंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे सामने अन्य ठिकाणी स्थलांतरित केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंडचा पहिला सामना ३ ऑक्टोबर रोजी बेंगळूरु येथे द. आफ्रिकेविरुद्ध नियोजित आहे. तथापि, एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतरच इंग्लंडच्या सामन्यासह संपूर्ण वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होईल.
नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, एमी जोन्स, टॅमी ब्यूमोंट, हेदर नाइट, डॅनी व्याट-हॉज, चार्ली डीन, लॉरेन बेल, सोफिया डंकले, एम अर्लट, लिंडसे स्मिथ, सारा ग्लेन, एम्मा लॅम्ब, एलिस कॅप्सी, लॉरेन फाइलर