Dilip Vengsarkar Slams IND Players pudhari
स्पोर्ट्स

Dilip Vengsarkar Slams IND Players: आयसीसीने यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे... भारताच्या माजी कर्णधाराने दिला घरचा आहेर

आता खेळाडूंना मैदानात आणि मैदानाबाहेर कसं वागायचं हे शिकवावं लागणार आहे.

Anirudha Sankpal

Dilip Vengsarkar Slams IND U19 Players: आशिया कप फायनलमध्ये भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभव केला. या विजयानंतर संघाने मैदानात एकच जल्लोष केला. मात्र काही खेळाडूंच्या व्यवहारावर भारताचे माजी कर्णधार आणि माजी निवडसमिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी कडक शब्दात टीका केली आहे. त्यांच्या मते असे वागणे खेळ भावनेच्या विरूद्ध असून युवा खेळाडूंवर याचा वाईट परिणाम होईल.

दिलीप वेंगसरकर वर्तनुकीवर नाराज

शनिवारी १४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरूद्धच्या फायनल सामन्यात सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात धावत येत जोरदार सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी भारतीय खेळाडू हे पाकिस्तानी विकेटकिपरच्या अगदी जवळ जाऊन त्याच्यावर ओरडून त्याच्याविरूद्ध अपशब्द वापरून सेलिब्रेशन करत होते. काही खेळाडूंनी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमच्या आणि खेळाडूंच्या दिशेने कूच करत अभद्र हातवारे केले. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, दिलीप वेंगसरकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, 'ही गोष्ट अजिबात चांगली नाही. युवा खेळाडू हे सर्व टीव्हीवर पाहत होते. आता अंडर १४, अंडर १६ आणि अंडर १९ क्रिकेट खेळणारे खेळाडू याची कॉपी करू शकतात. जर असेच सुरू राहिले तर आपण कुठं जातोय याचा विचार करावा लागले. आता खेळाडूंना मैदानात आणि मैदानाबाहेर कसं वागायचं हे शिकवावं लागणार आहे. यासाठी नॅशनल क्रिकेट अकॅडमी किंवा दुसऱ्या माध्यमांचा वापर करता येऊ शकतो.'

भारत - पाकिस्तान सामना असला तरी...

माजी दिग्गज फलंदाज वेंगसरकर यांनी भारत - पाकिस्तान सामन्यावेळी भावना तीव्र असतात मात्र म्हणून गैर कृत्याचे समर्थन होऊ शकत नाही. वेंगसरकर म्हणाले की, 'भारत-पाकिस्तान सामना खूप भावनिक पातळीवर खेळला जातो. तिथं पॅशन सर्वोच्च स्तारवर असते. मात्र याचा अर्थ असा नाही की जे मान्य नाही त्या पद्धतीचे वर्तन करण्याची मुभा आहे. यामुळे युवा खेळाडूंसमोर चुकीचे उदाहरण सेट होत आहे.'

मुंबईत ग्रास रूट स्तरावर क्रिकेट वाढवण्यात सक्रीय असलेल्या दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या क्रिकेट अकॅडमीत देखील या प्रकारचे वर्तन पहायला मिळत आहे असं सांगितलं. ते म्हणाले, 'मी माझ्या अकॅडमीत देखील ही गोष्ट पाहत आहे. ज्यावेळी एखादी टीम जिंकते त्यावेळी खेळाडून मैदानात धावत जातात, स्टंप उखडून काढतात आणि नाचू लागतात. पूर्वी असं होत नव्हतं. आता युवा खेळाडू टीव्हीवर पाहतात आणि त्याची नक्कल करतात.'

ICC आणि ACC ने कडक कारवाई करावी

वेंगसरकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सील आणि एशियन क्रिकेट काऊन्सील किंवा मॅच रेफरी यांनी या खेळाडूंवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी खेळात एक शिस्त राखण्यासाठी एक चांगली आचारसंहिता असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केलं.

त्यांच्या मते प्रत्येक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी खेळाडूंसोबत संभाषण केलं पाहिजे. मग ते खेळाडू अंडर १९ चे असो किंवा अंडर १७ चे त्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मैदानावर कशा प्रकारचा व्यवहार चालतो आणि कोणता व्यवहार चालणार नाही. वेंगसरकर यांनी प्रशिक्षकांनी देखील आपली जबाबदारी निभावली पाहिजे असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT