स्पोर्ट्स

IPL 2026 च्या हंगामात CSKची होणार गोची! आयुष, ब्रेव्हिस, पटेलला खेळवण्यासाठी करावी लागणार कसरत

‘CSK’ला ‘IPL’च्या पुढील पर्वात आयुष, ब्रेव्हिस, पटेल या बदली खेळाडूंना संघात कायम ठेवायचे असेल, तर याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे.

रणजित गायकवाड

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जला ‘इंडियन प्रीमियर लीग 2025’मधून गाशा गुंडाळावा लागला आहे. 11 सामन्यांत या संघाला फक्त दोन विजय मिळवता आल्याने ते गुणतालिकेत तळाच्या क्रमांकावर आहेत. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे 5 सामन्यांनंतर माघार घ्यावी लागली आणि महेंद्रसिंग धोनी पुन्हा कर्णधार झाला. तरीही ‘सीएसके’ला पुनरागमन करता आले नाही.

या प्रवासात पाचवेळच्या विजेत्या चेन्नईने संघात काही युवा खेळाडूंना करारबद्ध केले. 17 वर्षीय आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेव्हिस व उर्विल पटेल यांची संघात खोगीर भरती करून घेतली. आयुष व ब्रेव्हिस यांनी दमदार खेळ करून त्यांची निवड सार्थ ठरवली. परंतु, ‘सीएसके’ला ‘आयपीएल’च्या पुढील पर्वात या तिन्ही खेळाडूंना संघात कायम ठेवायचे असेल, तर याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे.

चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी 17 वर्षीय आयुष म्हात्रेला संघात घेतले, तर गुरजपनीत सिंगच्या जागी ब्रेव्हिसची एंट्री झाली. सोमवारी वंश बेदी दुखापतग्रस्त असल्याचे जाहीर करून चेन्नईने टी-20 त वेगवान शतक झळकावणार्‍या भारतीय फलंदाज उर्विल पटेलला ताफ्यात घेतले. ‘आयपीएल 2026’मध्ये ऋतुराज व गुरजपनीत यांचे पुनरागमन निश्चित आहे, मग अशा वेळी रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलेल्या खेळाडूंचे काय होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

ऋतुराजने कोपरा दुखत असल्यामुळे माघार घेतली अन् फ्रँचायझीने 30 लाखांत आयुषला संघात घेतले. त्याने 4 सामन्यांत 40.75 च्या सरासरीने 163 धावा केल्या. 94 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याचवेळी गुरजपनीतच्या जागी घेतलेल्या ब्रेव्हिससाठी फ्रँचायझीने 2.2 कोटी रुपये मोजले. वंश बेदीला त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर आता उर्विल पटेल याला चेन्नईने बदली खेळाडू म्हणून संघात घेतले आहे. चेन्नईने उर्विलला 30 लाखांच्या किमतीत संघात घेतले आहे.

‘आयपीएल’च्या रिप्लेसमेंट नियमानुसार कोणत्याही फ्रँचायझीने लीगच्या मध्यंतरात एखाद्या खेळाडूला करारबद्ध केले, तर त्याला दिली जाणारी रक्कम ही सॅलरी कॅपमध्ये जोडली जात नाही; पण फ्रँचायझीने त्या खेळाडूंना पुढील पर्वासाठी कायम राखण्याचा निर्णय घेतल्यास बदली खेळाडूंना दिली जाणारी रक्कम ही त्यांच्या सॅलरी कॅपमधून वगळली जाते; पण त्याचवेळी फ्रँचायझीच्या खेळाडूंची संख्या ही 25च्या वर जाता कामा नये.

जर चेन्नईने आयुष, ब्रेव्हिस किंवा उर्विल यांना ‘आयपीएल 2026’साठी कायम राखण्याचा निर्णय घेतला, तर त्यांच्या 120 कोटींच्या पर्समधून या खेळाडूंना दिली जाणारी रक्कम कापली जाईल. चेन्नईला भविष्याच्या दिशेने बांधणी करायची असल्यास ते आयुष, ब्रेव्हिस किंवा उर्विल यांना रिलीज करणार नाहीत. परंतु, त्यांना 25 खेळाडूंचे समीकरण व 120 कोटींच्या आत या सर्वांना संघात राखण्याचे गणित जुळवावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT