McCullum Alcohol Guidelines Pudhari
स्पोर्ट्स

McCullum Alcohol Guidelines : 'पुन्हा रंगणार दारूची पार्टी!' प्रशिक्षक मॅक्युलमची इंग्लंड संघाला खुली सूट; पण ठेवली एक अट!

भारताविरुद्धच्या टी-२० मालिका विजयानंतर मुख्य प्रशिक्षकांनी नियमात आणली शिथिलता

पुढारी वृत्तसेवा

McCullum Alcohol Guidelines : मैदानावर क्रिकेटचा थरार आणि मैदानाबाहेर दारू पिऊन 'राडा' घालणे हे इंग्लंडच्या क्रिकेटपटूंसाठी नवे नाही. अँड्र्यू फ्लिंटॉफच्या 'पेडलो' प्रकरणापासून ते बेन स्टोक्सच्या नाईट क्लबमधील राडा प्रकरणाने क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमधील काही क्रिकेटपटूंच्या 'मद्यधुंद' वृत्तीने नाईट क्लबमधील हाणामारी असो की हॉटेलमधील हायव्होल्टेज ड्रामा, याची खमंग चर्चा जगभरातील माध्यमांमध्ये होते. मात्र आता पुन्हा एकदा इंग्लंड क्रिकेट संघ आणि दारू पार्ट्या यांची चर्चा सुरू झाली आहे. कारणही तसेच आहे. संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी इंग्लंड संघाला दारू पिण्याची खुली सूटच दिली आहे. मात्र यासाठी एक अटही ठेवली आहे.

इंग्लंडने पटकावले ICC टी-20 क्रमवारीत अव्वल स्थान

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लंडने टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा ४-० असा नामुष्कीजनक पराभव केला. या विजयासह संघाने आयसीसी (ICC) टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आणि भारताचे वर्चस्व संपुष्टात आणले. या यशाने सध्या इंग्लंड संघ भलताच आनंदात आहे. अशा वातावरणात मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी खेळाडूंना पुन्हा एकदा दारू पार्ट्या करण्याची परवानगी दिली आहे.

मॅक्युलम यांनी आणली नियमात शिथिलता

'क्रीकबीझ'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) मद्यपानाबाबत सामन्याच्या आदल्या दिवशी, सामन्याच्या दिवशी आणि सामन्यानंतरच्या कालावधीसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती; परंतु मॅक्युलम यांनी या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. यापूर्वी इंग्लंड क्रिकेटपटूंच्या मद्यपानाशी संबंधित पार्ट्यांवर टीका झाली होती. अशीच टीकेची झोड उठल्यानंतर संघाचा स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्सने कसोटी मालिकेदरम्यान निवृत्तीची घोषणा केली. 'द टेलिग्राफ'ने नुकत्याच शुक्रवारी ईसीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल वृत्त दिले होते, तरीही प्रशिक्षक मॅक्युलम यांनी आपल्या स्वतःच्या पद्धतीने काम करणे पसंत केले आहे.

मुख्य प्रशिक्षकांनी केला आपल्या अधिकाराचा वापर

मद्यपानाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये एक तरतूद होती. त्यानुसार मॅक्युलम आणि व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांना योग्य वाटल्यास नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा अधिकार होता. परिणामी, साऊथम्प्टन येथे झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यात भारतावर विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षकांनी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला.

काय म्हणाले मॅक्युलम?

या निर्णयाबाबत बोलताना मॅक्युलम म्हणाले, "आमच्यातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ प्रत्यक्षात मद्यपान करत नाहीत, पण बिअर पिण्याची इच्छा झाली तर तुम्ही पिऊ शकता. यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आहेत. खेळाडूंच्‍या याची पूर्ण कल्पना आहे; ती सर्वांपर्यंत पोहोचवली गेली आहेत. हे धोरण अशा प्रकारे तयार केले आहे की ज्यामुळे लोकांची काळजी घेतली जाईल आणि ते समंजस निर्णय घेतील."

पण ठेवली 'ही' एकच अट..!

"मला खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. यशाचा तो आनंद अनुभवण्याची इच्छा प्रत्येकालाच असते; आणि जर तुम्हाला बिअरचा आस्वाद घ्यायचा असेल, तर आजची रात्र त्यासाठी उत्तम आहे. पण अट ही आहे की, त्याचे सेवन संयमाने आणि मर्यादेत केले जावे. जेणेकरून गेल्या दहा दिवसांत मिळवलेल्या यशाचा मनसोक्त आनंद घेता येईल. फक्त एवढेच की, कोणाचेही कृत्य दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर झळकता कामा नये." अशी अट मॅक्युलम यांनी खेळाडूंसमोर ठेवली आहे. अर्थात, मद्यपानाचे सेवन संयमाने आणि मर्यादेत केले जावे. जेणेकरून गेल्या दहा दिवसांत मिळवलेल्या यशाचा मनसोक्त आनंद घेता येईल. नियमावलीची सर्वांनाच चांगली जाणीव आहे आणि मला वाटते की आपण शांतपणे बिअरचा आनंद घेऊ, असे मॅक्युलम यांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT