
भारताने टॉस (नाणेफेक) जिंकून पाकिस्तानविरुद्ध आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले की, आजच्या सामन्यात भारती फुलमाली खेळत आहे. टीम इंडिया या सामन्यात तीन स्पिनर्स (फिरकीपटू) आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे.
स्मृती मानधना (४४ चेंडूंत ६८) व हरमनप्रीत कौर (३५ चेंडूंत ३६) यांच्या संघर्षमय खेळाच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाविरुद्ध येथील ‘आयसीसी’ टी-२० विश्वचषक साखळी लढतीत निर्धारित २० षटकांत ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली. स्मृतीच्या खेळीत ९ चौकार व २ षटकार तर हरमनप्रीतच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश राहिला.
भारतीय संघाने येथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पहिल्याच चेंडूवर शेफाली वर्माने उत्तुंग षटकार खेचत आपले आक्रमक इरादेही स्पष्ट केले. मात्र, याच षटकातील पाचव्या चेंडूवर ती बादही झाली आणि भारताला पहिला धक्का सोसावा लागला. जेमिमा व भारती फुलमाळी याही स्वस्तात तंबूत परतल्या. स्मृती व हरमनप्रीत यांनी तिसर्या गड्यासाठी ९१ धावांची लक्षवेधी भागीदारी साकारत डावाला आकार देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताची पहिल्या टप्प्यातील फलंदाजी अगदीच संथ स्वरूपाची राहिली. प्रारंभीच लागोपाठ तीन धक्के बसल्याने भारताला बचावात्मक पवित्र्यावर भर देणेही भागच होते. मात्र, एकदा स्मृती व हरमनप्रीत सेट झाल्यानंतर या जोडीने धावफलक हलता ठेवताना अधूनमधून चौकार-षटकारही वसूल केले आणि यामुळे संघाला नंतर पावणेदोनशे धावांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचता आले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ : २० षटकांत ६/१७० (स्मृती मानधना ४४ चेंडूंत ६८, हरमनप्रीत कौर ३५ चेंडूंत ३६. सादिया इक्बाल व फातिमा सना प्रत्येकी २ बळी).
ऋचा घोषच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत १७० धावांचे मजबूत आव्हान उभे केले आहे. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने टाकलेले शेवटचे षटक कमालीचे नाट्यमय ठरले.
या षटकात ऋचा घोषने पाकिस्तानच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत एक चौकार आणि वाईडच्या रूपाने मिळालेल्या बोनस धावांमुळे भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. मात्र, विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात ऋचा त्रिफळाचीत झाली. बाद होण्यापूर्वी ऋचाने अवघ्या १७ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३४ धावांची अत्यंत मौल्यवान आणि झंझावाती खेळी केली.
शेवटच्या चेंडूवर श्रेयंका पाटीलविरुद्ध पायचितचे (LBW) मोठे आवाहन करण्यात आले होते, परंतु रिव्ह्यूमध्ये चेंडू ग्लव्हजला लागल्याचे स्पष्ट झाल्याने ती नाबाद राहिली. भारताने अखेर १७० धावांपर्यंत मजल मारली असून पाकिस्तानसमोर विजयासाठी १७१ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे.
सामन्याच्या उत्तरार्धात लागोपाठ विकेट्स पडल्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाला ऋचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी जोरदार कमबॅक करून दिले आहे. पाकिस्तानची गोलंदाज तस्मिया रुबाबच्या १९ व्या षटकात भारतीय फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत तब्बल २३ धावा वसूल केल्या.
या षटकाची सुरुवात दीप्ती शर्माने चौकाराने केली. २२ चेंडूंनंतर भारताला हा पहिलाच चौकार मिळाला. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या ऋचा घोषने पाकिस्तानी गोलंदाजीची पिस्रे काढली. ऋचाने पुढील पाच चेंडूंमध्ये सलग ४, ६, ४, ४ अशा धावा कुटत मैदान डोक्यावर घेतले. तिने या षटकात १ उत्तुंग ७७ मीटरचा षटकार आणि ३ धडाकेबाज चौकार मारले.
विशेष म्हणजे, संथ गतीने गोलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानला मैदानाबाहेर एक क्षेत्ररक्षक कमी ठेवण्याचा दंड (Penalty) सोसावा लागला, ज्याचा पूर्ण फायदा ऋचाने उठवला. या महागड्या षटकामुळे भारताने सन्मानजनक धावसंख्येकडे वेगाने कूच केली आहे.
महत्त्वाच्या क्षणी कर्णधार हरमनप्रीत कौर बाद झाल्याने भारतीय महिला संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने हरमनप्रीतला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.
डावाच्या १७ व्या षटकात फातिमा सनाने टाकलेल्या लेग-स्टंपवरील चेंडूवर हरमनप्रीतने सहजतेने फ्लिक शॉट खेळला. मात्र, चेंडूला हवी तशी दिशा न मिळाल्याने तो थेट डीप स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या नतालिया परवेजच्या हातात विसावला. हा झेल इतका सोपा होता की जणू काही झेल घेण्याचा सराव सुरू आहे असे वाटत होते. ३५ चेंडूंत ४ चौकारांसह ३६ धावांची उपयुक्त खेळी करून हरमनप्रीत माघारी परतली. ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने भारताचा डाव आता पूर्णपणे गडगडला असून खालच्या फळीतील फलंदाजांवर धावसंख्या सन्मानजनक नेण्याचे आव्हान आहे.
स्मृती मानधना बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या भारती फुलमालीला आपली चमक दाखवता आली नाही. सादिया इक्बालने भारतीला त्रिफळाचीत करत भारताला चौथा आणि लागोपाठ दुसरा धक्का दिला आहे.
भारती फुलमालीने पुढे सरसावत सादियाच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सादियाने चपळाईने चेंडूचा वेग कमी केला, ज्यामुळे भारती चेंडूची फ्लाईट जज करू शकली नाही. ती क्रीज सोडून खूप पुढे आल्याने यष्टीरक्षक मुनीबा अलीने कोणतीही चूक न करता यष्ट्या उडवल्या. भारती केवळ १ धाव काढून बाद झाली. या लागोपाठच्या धक्क्यांमुळे भारतीय संघ आता दडपणाखाली आला असून मैदानावर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांची जोडी आहे.
दोन जीवदान मिळाल्यानंतर अखेर सलामीवीर स्मृती मानधनाची शानदार खेळी संपुष्टात आली आहे. रमीन शमीमने भारताला हा तिसरा आणि सर्वात मोठा झटका दिला.
सामन्याच्या १४ व्या षटकात रमीन शमीमच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत मानधनाने हवेत शॉट खेळला. मात्र, चेंडू बॅटवर नीट न आल्यामुळे तिला योग्य उंची मिळवता आली नाही. लाँग-ऑन क्षेत्रातून वेगाने धावत आलेल्या पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने पुढे सरकत एक अप्रतिम आणि दडपणाखाली उत्कृष्ट झेल टिपला. स्मृती मानधनाने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची तुफानी खेळी केली. ती बाद झाल्यानंतर आता भारतीय डावाची धुरा कर्णधार हरमनप्रीत कौर आणि भारती फुलमाली यांच्यावर आहे.
सलामीवीर स्मृती मानधनाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चौकार खेचत आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले आहे. डावाच्या १२ व्या षटकात रमीन शमीमच्या फिरकीवर मानधनाने पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरवरून एक अप्रतिम चौकार वसूल केला आणि पन्नास धावांचा टप्पा ओलांडला.
काही षटकांपूर्वी पाकिस्तानने स्मृती मानधनाचा एक सोपा झेल सोडला होता, ज्याचा तिने पुरेपूर फायदा उठवला. अर्धशतक पूर्ण होताच मानधनाने बॅट उंचावून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. गेल्या दोन षटकांत तिने आपल्या फलंदाजीचा गिअर बदलत धावांचा वेग कमालीचा वाढवला असून ती भारतीय डावाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीचे दोन झटके बसल्यानंतर भारतीय महिला संघाने पॉवरप्ले अखेर २ बाद ३८ धावा केल्या. सलामीवीर शेफाली वर्मा (६) आणि जेमिमा रॉड्रिग्स (१) स्वस्तात बाद झाल्यामुळे भारत काहीसा अडचणीत आला होता.
पॉवरप्ले संपला असून आता डावाची धुरा कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना या अनुभवी जोडीवर आहे. या दोन्ही स्टार फलंदाज सध्या क्रीजवर टिकून असून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
सलामीवीर शेफाली वर्मानंतर भारताला दुसरा मोठा धक्का बसला. जेमिमा रॉड्रिग्स अवघ्या १ धावेवर बाद झाली. त्यामुळे पॉवरप्लेमध्येच भारताची स्थिती नाजूक झाली.
सामन्याच्या चौथ्या षटकात तस्मिया रुबाबच्या गोलंदाजीवर जेमिमाने लेग-साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या वरच्या कडेला (top-edge) लागून हवेत उडाला. कव्हर क्षेत्रातून पुढे आलेल्या नतालिया परवेजने पहिल्या प्रयत्नात चेंडू निसटल्यानंतरही चपळाईने दुसऱ्या प्रयत्नात एका हाताने अप्रतिम झेल टिपला. जेमिमा रॉड्रिग्स ७ चेंडूंत केवळ १ धाव काढून बाद झाली असून, ४ षटकांच्या आतच भारताने २ महत्त्वाचे गडी गमावले.
भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेफाली वर्मा स्वस्तात बाद झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात सादिया इक्बालच्या पहिल्या चेंडूवर शेफालीने षटकार मारत धडाकेबाज सुरुवात केली होती. मात्र, पाचव्या चेंडूवर सादियाने जोरदार पुनरागमन केले.
सादियाने टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू शेफालीच्या अपेक्षेपेक्षा जास्त उसळला. मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूने तिच्या बॅटची बाहेरील कडा घेतली आणि यष्टीरक्षक मुनीबा अलीने एक उत्कृष्ट झेल टिपला. शेफाली वर्मा ५ चेंडूंत ६ धावा करून माघारी परतली. भारताला पहिला धक्का पहिल्याच षटकात ६ धावांवर बसला.
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड.
पाकिस्तान: गुल फिरोजा, मुनीबा अली (यष्टीरक्षक), आयशा जफर, सायरा जबीन, आलिया रियाज, नतालिया परवेज, फातिमा सना (कर्णधार), रमीन शमीम, नाशरा संधू, तस्मिया रुबाब, सादिया इक्बाल.