स्पोर्ट्स

BCCI Meeting : दुसऱ्या वन-डे पूर्वी ‌‘बीसीसीआय‌’ची गंभीर-आगरकर यांच्यासह तातडीची बैठक

Team India strategy : गौतम गंभीर व काही वरिष्ठ खेळाडूंत मतभेद असल्याची चर्चा

रणजित गायकवाड

bcci emergency meeting gambhir agarkar before second odi

रांची : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुसऱ्या वन-डे लढतीपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि इतर काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता असून, संघ निवडीत सातत्य हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.

गौतम गंभीर व काही वरिष्ठ खेळाडूंत मतभेद असल्याची चर्चा होत असून, यावरही चर्चा होणार का, हा औत्सुक्याचा मुद्दा असेल. सामन्याच्या दिवशीच बैठक होणार असल्याने संघातील कोणत्याही खेळाडूंना यात बोलावले जाणार नाही, असे संकेत आहेत.

एका वृत्तानुसार, या चर्चेत ‌‘बीसीसीआय‌’चे सचिव देवजित सैकिया, संयुक्त सचिव प्रभतेज सिंग भाटिया, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सहभागी होण्याची शक्यता आहे. नव्याने नियुक्त झालेले ‌‘बीसीसीआय‌’चे अध्यक्ष मिथुन मन्हास हे उपस्थित राहतील की नाही, हे मात्र या वृत्तात स्पष्ट केलेले नाही.

या बैठकीचा उद्देश, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत टीम इंडियाला जाणवलेल्या त्रुटी दूर करणे हा आहे. गंभीर आणि आगरकर दोघेही बैठकीला उपस्थित असल्याने, व्यवस्थापनाच्या काही विशिष्ट पैलूंवर स्पष्टता मिळवून भविष्यातील पाऊल उचलण्याची ‌‘बीसीसीआय‌’ची योजना आहे. मायदेशातील कसोटी हंगामादरम्यान मैदानावर आणि मैदानाबाहेर गोंधळात टाकणाऱ्या रणनीती दिसून आल्या आहेत. विशेषतः, पुढील कसोटी मालिका आठ महिन्यांनी होणार असल्याने आम्हाला स्पष्टता आणि दूरगामी नियोजन हवे आहे, असे एका अधिकाऱ्याने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.

पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल आणि त्यानंतरच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही संघ मजबूत दावेदार असेल, त्यामुळे आम्हाला हे मुद्दे लवकरात लवकर निकाली काढायचे आहेत, याचाही या अधिकाऱ्याने उल्लेख केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT