

Virat Kohli Century Records
भारतीय संघाचा रन मशीन फलंदाज विराट कोहली मैदानावर उतरला की विक्रमांची चर्चा अटळ ठरते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८३ शतके झळकावणाऱ्या कोहलीने, आठवड्याच्या कोणत्या दिवशी सर्वाधिक शतके ठोकली आहेत, याचा एक रंजक आणि महत्त्वपूर्ण आकडा आता समोर आला आहे. ३७ वर्षीय कोहलीची धावांची भूक आणि त्याची अविश्वसनीय तंदुरुस्ती आजही क्रिकेट चाहत्यांसाठी चकीत करते.
विराट कोहली कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांची एकदिवसीय सामन्यात त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
या सामन्यात त्याने केवळ उत्कृष्ट शतक झळकावले नाही, तर वयाच्या ३७ व्या वर्षीही त्याची मैदानावरील चपळता आणि गतिमानता विशेष उल्लेखनीय होती. त्याचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि शतकी खेळीदरम्यान धावून काढलेल्या धावा पाहता, तो आपल्या तंदुरुस्तीवर किती प्रचंड मेहनत घेतो, हे स्पष्टपणे दिसून येते. वयाचा आकडा केवळ एक संख्या आहे हे तो मैदानावर दाखवून देतो.
३० नोव्हेंबर रोजी कोहलीने त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५२ वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ८३ वे शतक पूर्ण केले. या दिवशी रविवारी होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आठवड्यातील कोणत्या दिवशी सर्वात जास्त शतके झळकावली आहेत, याची एक रंजक आकडेवारीकडे नजर टाकूया. कोहलीने आजवर एकूण ५५४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या बॅटमधून ८३ शतकी खेळी साकारल्या आहेत. या आकडेवारीनुसार, किंग कोहलीने सर्वाधिक शतके ‘रविवार’ या दिवशी झळकावली आहेत.
सोमवार : ५
मंगळवार : ७
बुधवार : ११
गुरुवार : १५
शुक्रवार : ९
शनिवार : ११
रविवार : २५ शतके
या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते, की विराट कोहलीसाठी ‘रविवार’ हा फलंदाजीसाठीचा ‘धमाका’ करण्याचा दिवस आहे. त्यामुळे, यापुढे जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविवारी कोहलीचा सामना असेल, तेव्हा त्याच्या बॅटमधून विक्रमी शतकी खेळी पाहण्याची चाहत्यांना एक खास आशा नक्कीच राहील.