साईराज बहुतुले  Pudhari
स्पोर्ट्स

Sairaj Bahutule |IPL ते भारतीय संघ! अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI ने नियुक्त केला नवीन स्पिन बॉलिंग कोच

चंदीगड येथे ६ ते १० जून दरम्यान रंगणार कसोटी समाना

पुढारी वृत्तसेवा

Sairaj Bahutule India spin bowling coach

नवी दिल्ली : माजी भारतीय लेग-स्पिनर साईराज बहुतुले यांची अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे नवीन 'स्पिन-बॉलिंग कोच' (फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 'ईएसपीएन क्रिकइन्फो'च्या (ESPNcricinfo) अहवालानुसार, नवी चंदीगड येथे ६ ते १० जून दरम्यान हा कसोटी सामना रंगणार आहे. ५३ वर्षीय बहुतुले आता तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताच्या फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळतील. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये पंजाब किंग्स (PBKS) संघाचे फिरकी प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर बहुतुले आता थेट भारतीय संघात सामील झाले आहेत.

बहुतुले यांना प्रशिक्षणाचा मोठा अनुभव

माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांना प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी केरळ आणि बंगाल संघाचे प्रक्षिक म्‍हणून त्‍यांनी काम केले आहे. २०१८ ते २०२१ दरम्यान ते राजस्थान रॉयल्स (RR) संघासोबतही होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) प्रवेश केला, जिथे त्यांनी 'इंडिया ए' (India A) संघासोबत काम केले. माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळातही त्यांनी वरिष्ठ भारतीय संघाच्या काही मालिकांमध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

१९९७ ते २००३ दरम्यान भारताचे प्रतिनिधित्व

आयपीएल २०२५ मध्ये ते पुन्हा राजस्थान रॉयल्समध्ये परतले आणि त्यानंतर त्यांनी पंजाब किंग्सची जबाबदारी स्वीकारली होती.बहुतुले यांनी १९९७ ते २००३ दरम्यान भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्यांनी २ कसोटी आणि ८ एकदिवसीय (ODI) सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मर्यादित संधी मिळाल्या असल्या, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द जवळपास दोन दशके अत्यंत यशस्वी राहिली. त्‍यांनी १८८ प्रथम श्रेणी सामन्यांत ६३० विकेट्स आणि १४३ लिस्ट-ए सामन्यांत १९७ विकेट्स घेतल्या आहेत.

WTC गुणतालिकेत भारत सहाव्या स्थानावर

आपल्या या नवीन भूमिकेत बहुतुले हे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्कल, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांच्यासोबत काम करतील. सध्या सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या गुणतालिकेत भारत ९ सामन्यांत ४ विजय, ४ पराभव आणि १ ड्रॉसह सहाव्या स्थानावर आहे.भारतीय संघाला मायदेशात गेल्या काही काळात कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. भारताने आपल्या शेवटच्या तीन कसोटी मालिकांपैकी दोन मालिका गमावल्या आहेत, ज्यात २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-० आणि २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० अशा पराभवाचा समावेश आहे.

कसोटीसह वनडेचे नेतृत्त्‍व शुभमनकडे

६ जूनपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १४ ते २० जून दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका देखील खेळवली जाईल. दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी ऋषभ पंतच्या जागी के.एल. राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ५० षटकांच्या (वनडे) फॉरमॅटसाठी श्रेयस अय्यरला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार.

भारताचा वनडे संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT