T20 World Cup 2026 Babar Azam slow innings
कोलंबो : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची संथ सुरुवात चर्चेचा विषय ठरली आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज रिकी पाँटिंग आणि रवी शास्त्री यांनी बाबरच्या सध्याच्या फॉर्मवर आणि पाकिस्तान संघातील त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाकिस्तानने नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला असला, तरी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बाबरने १८ चेंडूत केवळ १५ धावा केल्या. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने नाबाद अर्धशतक झळकावले होते, मात्र पाँटिंगच्या मते बाबरच्या खेळात आता पूर्वीसारखा जोश उरलेला नाही. तो म्हणाला, "जेव्हा तुम्ही १८ चेंडूत १५ धावा करता, तेव्हा तुम्ही स्वतःवरच नाही तर समोरच्या फलंदाजावरही दबाव आणता," असे पाँटिंगने 'आयसीसी रिव्ह्यू'मध्ये बोलताना सांगितले. "बाबरला डावाच्या सुरुवातीलाच चौकार-षटकार मारावे लागतील, अन्यथा तो मैदानात येईल तेव्हा खेळाचा वेग मंदावेल."
मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांवर आक्रमण करण्याची बाबरची क्षमता कमी झाली आहे. "मला असे वाटते की त्याची 'बॉल स्ट्रायकिंग' क्षमता आणि ताकद कुठेतरी हरवली आहे. आता तो पूर्वीचा बाबर राहिलेला नाही. पाकिस्तानला या स्पर्धेत पुढे जायचे असेल, तर त्यांना बाबरच्या सर्वोत्तम फॉर्मची गरज आहे," असे परखड मत पाँटिंगने व्यक्त केले.
माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही पाँटिंगच्या सुरात सूर मिसळला. शास्त्री म्हणाले की, "कारकिर्दीच्या या टप्प्यावर तुमच्यावर अपेक्षांचे मोठे ओझे असते. बाबरने सुरुवातीच्या ५ चेंडूंमध्येच आक्रमक पवित्रा घेऊन चौकार मारण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल."
बाबरच्या फलंदाजीच्या क्रमांकाबाबतही दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पाँटिंगच्या मते, "बाबरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे. पॉवरप्लेमध्ये जेव्हा फक्त दोन क्षेत्ररक्षक बाहेर असतात, तेव्हा त्याला धावा करणे सोपे जाईल. पाकिस्तानला आता मोठा निर्णय घ्यावा लागेल तो म्हणजे, 'बाबरला संघात कायम ठेवायचे की बाहेर बसवायचे?' शास्त्रींनीही इशारा दिला आहे की, जर कामगिरी सुधारली नाही तर अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. १० फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे पाकिस्तानचा सामना अमेरिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही सर्वांचे लक्ष बाबर आझमच्या कामगिरीवर असणार आहे.