

T20 World Cup 2026 IND vs PAK: टी२० वर्ल्डकप २०२६ सुरू होऊन दोन दिवस झाल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आता नवं नाटकं सुरू केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीबरोबर सध्या सुरू असलेला वाद संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पीसीबीने यासाठी ३ मागण्या ठेवल्या आहेत. याबाबतचे वृत्त एनडीटीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
पाकिस्ताननं यापूर्वी टी २० वर्ल्डकप २०२६ मधील भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आयसीसीने याचे काय गंभीर परिणाम होतील याची जाणीव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला करून दिली आहे. आता सूत्रांच्या माहितीनुसार पीसीबीने आयसीसीसोबत सुरू असलेला हा वाद संपवण्यासाठी तीन मागण्या ठेवल्या आहेत. त्यांनी बांगलादेशला मिळणारी नुकसान भरपाई वाढून देण्यात यावी, याचबरोबर जरी बांगलादेश टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडला असला तरी त्यांची प्रवेश फी त्यांना देण्यात यावी, याचबरोबर भविष्यात आयसीसी स्पर्धेचे आयोजनपदाचे अधिकार या अशा तीन मागण्या केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी हे भारतासोबतचा सामना खेळण्यास तयार आहेत. हा सामना कोलंबो इथे १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी या प्रकरणी सहकार्य करण्यास तयार नाहीयेत. आता नक्वी हे पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सोमवारी भेटणार आहेत. ते अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करणार आहेत.
आयसीसीने भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला टी २० वर्ल्डकपमधून वगळलं असून स्कॉटलँडला टी २० वर्ल्डकप खेळण्याची ऐन वेळी संधी मिळाली आहे.
पाकिस्तानने खुले आम बांगलादेशला पाठिंबा दिला असून त्यांनी आयसीसी बैठकीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली आहे.
आयसीसीने पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयानंतर मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पीसीबीने या सर्व निर्णयाची जबाबदारी सरकारवर ढकलली होती. त्यावेळी आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सरकारचा हस्तक्षेप होतोय का अशी विचारणा करत कडक नियमानुसार कारवाई करण्याची तयारी केल होती.