

मुंबई; वृत्तसंस्था : वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अटीतटीच्या सामन्यात दोन वेळच्या विजेत्या इंग्लंडने नेपाळवर 4 धावांनी निसटता विजय मिळवला. 185 धावांचा पाठलाग करताना नेपाळने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र, त्यांना 6 बाद 180 धावांपर्यंतच मजल मारता आली. लोकेश बमने 20 चेंडूंत 39 धावांची तुफानी खेळी केली; पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळची सुरुवात अडखळती झाली. आसिफ शेख (7) स्वस्तात बाद झाला; पण कुशल भुर्तेलने 17 चेंडूंत 29 धावा ठोकून डावाला गती दिली. त्यानंतर कर्णधार रोहित पौडेल (39) आणि दीपेंद्र सिंह ऐरी (39) यांनी तिसर्या विकेटसाठी 82 धावांची भक्कम भागीदारी करून इंग्लंडच्या गोटात खळबळ उडवून दिली. पौडेलने रशीद खानला मारलेला ‘स्विच-शॉट’ सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला.
शेवटच्या तीन षटकात 46 धावांची गरज असताना लोकेश बमने जोफ्रा आर्चर आणि ल्यूक वूडवर हल्ला चढवत सामन्यात रंगत आणली. शेवटच्या षटकात विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. मात्र, सॅम कुरेनने अचूक यॉर्कर टाकून नेपाळला रोखले. नेपाळला शेवटच्या षटकात केवळ 5 धावा काढता आल्या.
तत्पूर्वी, इंग्लंडने जेकब बॅथेल (55) आणि कर्णधार हॅरी ब्रूक (53) यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 184 धावांचा डोंगर उभा केला. नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला जोस बटलर (26) आणि फिल सॉल्टला (1) बाद करून इंग्लंडला झटके दिले होते. नेपाळकडून नंदन यादव आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
विजयासाठी शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता असताना नेपाळचा संघ मोठा उलटफेर नोंदवेल, अशीच चिन्हे होती. सेट झालेला लोकेश बमवर त्यांची सारी भिस्त होती. पहिल्या 4 चेंडूंत केवळ 5 धावा करता आल्यानंतर नेपाळला उर्वरित 2 चेंडूंत 6 धावांची गरज होती. यावेळी लोकेश स्ट्राईकवर होता. मात्र, सॅम कुरेनने पाचवा चेंडू बिनचूक यॉर्कर टाकत एकही धाव दिली नाही, तर शेवटच्या चेंडूवर लोकेशला षटकार टोलवता आला नाही व नेपाळची नामी संधी वाया गेली.
मुंबईचे वानखेडे स्टेडियम 17 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गच्च भरले होते. विशेष म्हणजे इंग्लंडपेक्षा नेपाळी समर्थकांची संख्या मोठी होती. आपल्या संघाच्या प्रत्येक धावेवर आणि इंग्लंडच्या प्रत्येक डॉट बॉलवर नेपाळी चाहत्यांनी केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता. पराभवानंतरही नेपाळने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली.