स्पोर्ट्स

Asian Games 2026 : ‘इलावेनिल’चा डबल ‘सिल्वर’ धमाका! भारताच्या स्टार नेमबाज खेळाडूचा जपानमध्ये डंका

Elavenil Valarivan silver medals : अपयशातून फिनिक्स भरारी! १० मीटर एअर रायफल प्रकारात पटकावली दोन रौप्यपदके

रणजित गायकवाड

आयची-नागोया (जपान) : भारताची आघाडीची नेमबाज इलावेनिल वलारिवन हिने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये अभूतपूर्व कामगिरी नोंदवत दुहेरी रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. रविवारी (२० सप्टेंबर) जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या या क्रीडा महोत्सवात तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारासह वैयक्तिक स्पर्धेतही चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करत भारताला दोन रौप्यपदके मिळवून दिली.

इलावेनिल वलारिवनचा क्रीडा प्रवास

२ ऑगस्ट १९९९ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या इलावेनिल १० मीटर एअर रायफल प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतात. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (आयएसएसएफ) नोंदींनुसार, त्यांनी २०१४ मध्ये नेमबाजीला सुरुवात केली असून नेहा चव्हाण या त्यांच्या प्रशिक्षक आहेत. इलावेनिलने इंग्रजी विषयातून पदवी (बी.ए.) संपादन केली आहे. नेमबाजीकडे वळण्यापूर्वी त्यांनी ॲथलेटिक्स, ज्युडो, बॅडमिंटन, हँडबॉल आणि कबड्डी यांसारख्या विविध खेळांमध्येही स्वतःला आजमावून पाहिले होते. कालांतराने नेमबाजी तिच्या कारकीर्दीचा अविभाज्य भाग बनली आणि तिनी अल्पावधीतच जागतिक पातळीवर स्वतःचा दबदबा निर्माण केला.

२०१८ मधील पहिले मोठे आंतरराष्ट्रीय यश

इलावेनिलने कनिष्ठ (ज्युनियर) पातळीवरही नेत्रदीपक कामगिरी नोंदवली. २०१८ मधील आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. याच स्पर्धेत तिने मिश्र सांघिक गटातही सुवर्णपदकावर मोहर उमटवली. या घवघवीत यशानंतर त्यांनी वरिष्ठ पातळीवरही यशाची परंपरा कायम राखत आयएसएसएफ विश्वचषक, विश्वचषक अंतिम फेरी आणि आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची लयलूट केली.

जागतिक क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान

आपल्या कारकीर्दीतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इलावेनिलने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान (वर्ल्ड नंबर-१) पटकावले होते. आज भारताच्या अग्रगण्य रायफल नेमबाजांमध्ये तिची गणना होते. आयएसएसएफच्या नोंदींनुसार, त्यांच्या नावे जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, विश्वचषक, विश्वचषक अंतिम फेरी आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा अशा विविध स्तरांवरील अनेक मानाच्या पदकांची नोंद आहे.

ऑलिम्पिकमधील आव्हानात्मक अनुभव

इलावेनिलने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमधून ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण केले होते. तेथे महिलांच्या १० मीटर एअर रायफल पात्रता फेरीत त्यांना १६ व्या, तर मिश्र सांघिक प्रकारात १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल पात्रता फेरीत १० वे स्थान मिळवले, तर भारतीय मिश्र संघासोबत त्या १२ व्या स्थानी राहिल्या. ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न जरी अधुरे राहिले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या स्पर्धा जिंकून त्यांनी आपली क्षमता सातत्याने सिद्ध केली आहे.

दुखापतींवर मात करत भरारी

इलावेनिलच्या कारकीर्दीत संघर्षाचा टप्पाही आला. गुडघा आणि पाठीच्या गंभीर दुखापतींचा सामना करावा लागल्यानंतरही त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर नेमबाजीच्या पटलावर दिमाखदार पुनरागमन केले. तिच्या या पुनरागमनात प्रशिक्षक नेहा चव्हाण आणि ऑलिम्पिक पदकविजेते गगन नारंग यांच्या मार्गदर्शनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरली. २०१४ मध्ये ‘गन फॉर ग्लोरी’ अकादमीत दाखल होऊन तिने नेहा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला होता, तर गगन नारंग यांनी तिला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील दैदिप्यमान कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये इलावेनिल यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सोनम मस्कर आणि विदर्सा विनोद यांच्या साथीने भारताला रौप्यपदक जिंकून दिले. भारतीय संघाने १८९८.० गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. या प्रकारात चीनने १९०४.२ गुणांसह सुवर्ण, तर जपानने १८९७.१ गुणांसह कांस्यपदक मिळवले.

सांघिक यशानंतर इलावेनिलने वैयक्तिक १० मीटर एअर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीतही उत्कृष्ट निशाणा साधत २५२.४ गुणांसह रौप्यपदक पटकावले. जपानच्या हिनाता ताइची हिने २५३.० गुणांसह या प्रकारातील सुवर्णपदक स्वतःच्या नावे केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT