दुबई : भारताविरुद्ध सुपर-4 लढतीत अर्धशतक झळकावल्यानंतर हवेत बंदुकीने गोळीबार केल्यासारख्या केलेल्या सेलिब्रेशनवर टीका झाल्यावर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानचे दे दणादण ट्रोलिंग झाले असले, तरी त्याच्यावर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. फरहानने या सामन्यानंतर बोलताना लोक काय विचार करतात याची मला पर्वा नाही, असे बरळत आपला माज तसाच कायम असल्याचेच अधोरेखित केले.
फरहानच्या या वादग्रस्त सेलिब्रेशनने सामाजिक माध्यमांवर बरीच चर्चा सुरू झाली. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना फरहान म्हणाला, माझ्यासाठी तो क्षण महत्त्वाचा होता. मी सहसा अर्धशतकानंतर अशाप्रकारे सेलिब्रेशन करत नाही; पण अचानक माझ्या डोक्यात ही कल्पना आली. मला माहीत नाही लोक त्याबद्दल काय विचार करतील; पण मला त्याची पर्वा नाही.
तुम्ही कोणत्याही संघाविरुद्ध खेळत असताना आक्रमक क्रिकेट खेळले पाहिजे. केवळ भारतासोबतच नाही, तर प्रत्येक संघाविरुद्ध आपण आक्रमक खेळ करायला हवा. आम्ही आज तेच केले, असेही त्याने पुढे सांगितले. आपली खेळी संघाच्या विजयासाठी अधिक महत्त्वाची ठरली असती, असे फरहानने मान्य केले. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चांगली कामगिरी केल्यास लोक त्याचे खूप कौतुक करतात. त्यामुळे जर आम्ही जिंकलो असतो, तर ते खूप चांगले झाले असते, असे त्याने पुढे म्हटले. श्रीलंकेविरुद्धचा सामना आपला संघ सहज जिंकेल, असा आशावादही त्याने शेवटी व्यक्त केला.
या सामन्यात फरहानने 45 चेंडूंमध्ये 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने 20 षटकांमध्ये 5 बाद 171 धावा केल्या होत्या. मात्र, भारताच्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या दमदार खेळीमुळे भारताने 19 व्या षटकातच हे आव्हान सहज पार क रत पाकला त्यांची जागा दाखवून देण्यात कसर सोडली नाही.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने प्रेक्षकांकडे पाहून ‘6.0’ चा हातवारे करत आणि फायटर जेटची नक्कल करून लक्ष वेधले. याचे सोमवारी दुसर्या दिवशीही जबरदस्त ट्रोलिंग झाले. रौफच्या आगळिकीला प्रत्युत्तर देत चाहत्यांनी त्यावेळी ‘कोहली, कोहली’ असा जयघोष करत त्याला डिवचले होते.
मे महिन्यात झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय वायूसेनेची सहा विमाने पाडण्यात आल्याचा दावा म्हणून रौफने असा हातवारा केल्याचे संकेत आहेत. यापूर्वी रौफला पाकिस्तानच्या प्रशिक्षण सत्रातही 6.0 चे हातवारे करताना पाहिले गेले आहे. या सामन्यात रौफची कामगिरी संमिश्र राहिली. त्याने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद केले. परंतु, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी त्याच्या 11 चेंडूंवर 18 धावा वसूल केल्या. प्रेक्षकांनी डिवचल्यानंतर त्याने दिलेले प्रत्युत्तर हे त्याला 2022 च्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीने सलग दोन षटकार मारल्याची आठवण करून देत होते.
8-0: टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना भारताने 8 वेळा धडाकेबाज विजय संपादन केले आहेत. असाच पराक्रम मलेशियानेही गाजवला असून, या छोटेखानी क्रिकेट प्रकारात त्यांनी थायलंडविरुद्ध पाठलाग करताना आठपैकी आठही सामने जिंकले आहेत.
172: दुबईमध्ये रविवारी भारताने केलेला 172 धावांचा यशस्वी पाठलाग, पाकिस्तानविरुद्धच्या त्यांच्या आठ यशस्वी पाठलागांमधील सर्वात मोठा आहे.
24 : अभिषेक शर्माने रविवारी अवघ्या 24 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूने केलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी 2012 मध्ये अहमदाबादमध्ये युवराज सिंगने 29 चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.
105 : अभिषेक आणि शुभमन गिल यांनी 105 धावांची सलामी भागीदारी केली, जी पुरुषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी सर्वात मोठी सलामी भागीदारी आहे. यापूर्वी, 2012 मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विराट कोहली-हार्दिक पंड्या यांच्यात 113 धावांची भागीदारी झाली होती. ही पाकिस्तानविरुद्ध भारताची एकमेव शतकी भागीदारी होती.
2 : अभिषेक शर्माचे 74 धावांचे अर्धशतक हे पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीराने केलेले दुसरे अर्धशतक आहे. यापूर्वी, 2007 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये गौतम गंभीरने केलेल्या 75 धावांच्या खेळीला या निमित्ताने उजाळा मिळाला.
69/0 : रविवारी पॉवरप्लेमध्ये भारताने 69 धावा केल्या, जे पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यांमध्ये त्यांचे सर्वात मोठे पॉवरप्लेमधील स्कोअर आहे. यापूर्वी, 2022 टी-20 आशिया चषकात दुबईमध्येच भारताने 62 धावा केल्या होत्या. त्यापूर्वी पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये 55 धावा केल्या होत्या. हा त्यांचा भारतावरचा या टप्प्यातील सर्वोच्च स्कोअर होता, 2012 मध्ये अहमदाबादमध्ये त्यांनी 54 धावांचा विक्रम मोडला.
45 : जसप्रीत बुमराहने त्याच्या चार षटकांमध्ये 45 धावा दिल्या. या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील संयुक्त तिसर्या सर्वाधिक धावा आहेत. पॉवरप्लेमधील तीन षटकांमध्ये त्याने 34 धावा दिल्या. यादेखील या टप्प्यात त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त धावा आहेत.
5 : रविवारी भारताने 5 झेल सोडले. 2019 नंतर टी-20 सामन्यांमध्ये एका सामन्यात भारताने 4 किंवा त्याहून अधिक झेल सोडण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी, 2023 मध्ये पुण्यात श्रीलंकेविरुद्ध त्यांनी चार झेल सोडले होते.
3 : सूर्यकुमार यादवला हॅरिस रौफने टी-20 सामन्यांमध्ये 3 वेळा बाद केले आहे. रौफ व सूर्यकुमार आतापर्यंत 3 सामन्यांत 10 चेंडूंमध्ये आमने-सामने भिडले असून, यात सूर्यकुमारने रौफविरुद्ध 11 धावा केल्या आहेत.