

आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 फेरीत रविवारी (दि. 21) भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरारक महामुकाबला रंगला होता. या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा हिरो ठरला. सुरुवातीपासूनच त्याने संयम आणि आक्रमकता यांचा मिलाफ साधत भारताच्या फलंदाजीला एक मजबूत पाया मिळवून दिला.
या थरारक सामन्यादरम्यान, अभिषेक आणि त्याचा जोडीदार शुभमन गिल यांची पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्याशी वादावादी झाली. पण या शाब्दिक चकमकीमुळे अभिषेक आणखीनच पेटून उठला, जणू काही ही घटना त्याच्यासाठी इंधनाचे काम करून गेली.
सामना जिंकल्यावर अभिषेकने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘‘तुम्ही बोला, आम्ही जिंकतो!’’
या सामन्याची सुरुवात अभिषेकसाठी काहीशी निराशाजनक झाली होती, कारण त्याने पहिल्याच षटकात साहिबजादा फरहानचा सोपा झेल सोडला होता. याच फरहानने पुढे अर्धशतक झळकावले. पण अभिषेकने ही चूक नंतर सुधारली. त्याने सईम अयुबचा महत्त्वाचा झेल घेतला आणि त्यानंतर फलंदाजीतून त्याने पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले.
अभिषेकने अवघ्या 39 चेंडूंमध्ये 74 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत सहा चौकार आणि पाच गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. त्याने मारलेला प्रत्येक फटका हा त्याच्या ताकदीचा पुरावा होता आणि त्याने एकहाती भारताच्या विजयाची खात्री केली. विशेष म्हणजे, डावाच्या पहिल्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीला मारलेला षटकार हा भारताच्या आक्रमक इराद्यांचा स्पष्ट संकेत होता. त्यानंतर भारतीय संघाने विजयाकडे कूच केली.
अखेरच्या क्षणी सूर्यकुमार यादव (0) आणि संजू सॅमसन (13) लवकर बाद झाल्यामुळे सामना थोडा कठीण वाटला, पण तोपर्यंत अभिषेकने विजयाचा पाया रचला होता. त्याच्या शानदार खेळीमुळेच भारताचा विजय सुकर झाला.